कोलकाता- कोलकाता येथील रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो आंदोलक आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. या आंदोलनाला नबन्ना अभिजान (अभियान) असे नाव देण्यात आले होते. त्यानुसार आज हजारो आंदोलकांनी नबन्ना म्हणजे पश्चिम बंगालच्या सचिवालयाकडे कूच केले. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांच्या मार्गात बॅरिकेडची भिंत उभारून, अश्रुधूर , पाण्याचा फवारा वापरून आणि हजारो पोलीस तैनात करून हे आंदोलन मोडून काढले. त्यावरून भाजपाने तृणमूल सरकारवर टीका केली असून उद्या बारा तासांच्या पश्चिम बंगाल बंदची हाक दिली आहे. ममता बॅनर्जी यांना या प्रकरणात पायउतार व्हावे लागेल अशी चर्चा आहे .
कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरवर झालेले बलात्कार-हत्या प्रकरण दिवसेंदिवस चिघळत आहे. या प्रकरणी राज्य सरकारच्या भूमिकेवरून लोकांमध्ये असंतोष असून या प्रकरणाचा तपास नीट होत नसल्याचा आरोप आहे. आज पश्चिम बंग छात्र समाज आणि संग्रामी जौठा मंचने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत नबन्ना अभिजान या रॅलीचे आयोजन केले होते. या आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने 6,000 पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. आंदोलक कुठल्याही मार्गाने सचिवालयाजवळ जाऊ नयेत, याची सर्व प्रकाराची काळजी घेण्यात आली होती. यासाठी कोलकाता पोलिसांनी दिल्लीचा फॉर्म्युला वापरला होता. दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड लावून लोखंडी भिंत उभारण्यात आली होती तशीच भिंत कोलकाता पोलिसांनीही उभारली होती. आंदोलकांनी बॅरिकेड तोडू नये म्हणून त्यांना ग्रीस लावण्यात आले होते. आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनही तैनात ठेवण्यात आले होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी काही आंदोलकांना आधीच अटक केली होती.
दुपारी एक वाजता आंदोलक कॉलेज स्क्वेअर, संत्रागाछी आणि हावडा मैदानावर जमले. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना आणि नागरिकदेखील सहभागी झाले होते. काहींच्या हातात भारताचा झेंडा होता. ते ममता बॅनर्जींविरुद्ध घोषणा देत होते. तिथून त्यांनी सचिवालयाकडे मोर्चा वळवला. विद्यार्थी आंदोलक नबन्नाजवळील हावडा ब्रिजवर पोहोचले, तेव्हा पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला, अश्रुधुरांच्या कांड्या फोडल्या, पाण्याच्या फवाऱ्याचा माराही केला. तरीही आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. पोलीस-प्रशासन आंदोलकांना मागे हटवण्याचा प्रयत्न करत असता आंदोलकांनी हावडा ब्रिजवर ठिय्या मांडला. हुगळी ब्रिज म्हणून प्रसिद्ध असलेल्या विद्यासागर सेतूकडे जाणाऱ्या मार्गावरही आंदोलकांनी बॅरिकेड तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनीही आंदोलकांवर दगड भिरकावले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बळजबरी उचलून वाहनांत भरले. त्यांना सचिवालयापासून दूर नेण्यात आले.
आंदोलकांचे म्हणणे होते की, आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो. आमच्याकडे कुठली शस्त्र नाहीत. आम्ही कुठलाही कायदा मोडलेला नाही. आम्ही फक्त मृत डॉक्टरला न्याय मिळावा, एवढीच मागणी करत आहोत. तरीही पोलिसांनी आम्हाला बळजबरीने फरफटवत गाडीत भरले. ही दडपशाही आहे. पश्चिम बंगालमध्ये काय चालू आहे, ते सर्व देश पाहात आहे. ममता बॅनर्जींनी राजीनामा द्यायलाच हवा. भाजपाने विद्यार्थ्यांच्या दडपशाहीचा निषेध म्हणून उद्या सकाळी 6 ते संध्याकाळी 6 अशा 12 तासांचा पश्चिम बंगाल बंदची हाक दिली आहे. भाजपाचे नेते दिलीप घोष म्हणाले की, सरकार दोषींना वाचवत आहे. त्यामुळे लोक संतप्त आहेत. परंतु सरकार त्यांच्यावरच निर्दयपणे लाठ्या चालवत आहे. तर कोलकाता पोलिसांनी या मोर्चाला कुठलीही परवानगी दिली नव्हती. पोलिसांनी या आंदोलनाला कोणतीही परवानगी दिली नव्हती. या मोर्चादरम्यान हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने
केला आहे.
नबन्ना म्हणजे नवे सचिवालय
2011 पूर्वी बंगालचे सचिवालय हे रॉयटर्स बिल्डिंगमध्ये होते. 2011 मध्ये ममता बॅनर्जी सरकारने हावडा येथील हुबळी नदीच्या काठावरील एका इमारतीचे सचिवालय म्हणून रूपांतर केले. तिला नबन्ना असे नाव दिले. नब म्हणजे नवीन.