नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रात दोन मोठ्या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे. यासाठी ७ हजार ९२७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार व उत्तरप्रदेशच्या अवधचा भाग महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. त्यामुळे व्यापार आणि नोकऱ्या वाढतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.
रेल्वेने मंजुरी दिलेल्या तीन प्रकल्पांमध्ये जळगाव मनमाड चौथा रेल्वे मार्ग १६० किलोमीटर, भुसावळ ते खंडवा १३१ किलोमीटर आणि प्रयागराज माणिकपूर तिसरा रेल्वे मार्ग ८४ किलोमीटर या प्रकल्पांचा समावेश आहे. या रेल्वे मार्गांना मंजुरी मिळाल्यामुळे या मार्गावरून होणारी माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूकीला चालना मिळणार आहे. महाराष्ट्रासह तीन राज्यातींल सात जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गामुळे रेल्वेचे जाळे ६३९ किमीने वाढणार आहे. हे प्रकल्प चार वर्षात पूर्ण होणार आहेत.
हा प्रस्तावित प्रकल्प मुंबई-प्रयागराज-वाराणसी मार्गावर दळणवळण वाढवणार आहे. नाशिक (त्र्यंबकेश्वर), खंडवा (ओंकारेश्वर), आणि वाराणसी (काशी विश्वनाथ) येथील ज्योतिर्लिंगांना जाणाऱ्या यात्रेकरूंना याचा फायदा तर होईलच पण त्याचबरोबर प्रयागराज, चित्रकूट, गया आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांवरील पर्यटनदेखील वाढणार आहे.