नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवार १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या दिवशी भारतीय शेअर बाजार निर्देशांक बीएसई आणि एनएसई नियमित वेळेनुसार लाईव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित करणार आहे. अर्थसंकल्पातील घोषणांवर गुंतवणूकदारांकडून वेळेवर प्रतिसाद मिळावा, हा यामागील उद्देश आहे.
इक्विटी मार्केटमध्ये दुपारी ३.३० वाजेपर्यंत नियमित ट्रेडिंग सत्र असणार आहे. तर कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्र असेल. याआधीदेखील अशा महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार खुला ठेवण्यात आला होता. २०२० आणि २०१५ (शनिवार, १ फेब्रुवारी २०२० आणि शनिवार, २८ फेब्रुवारी २०१५) मधील अर्थसंकल्पीय सादरीकरणाच्या दिवशीदेखील ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले होते. अर्थसंकल्पाचा दिवस हा शेअर बाजारासाठीदेखील महत्त्वाचा मानला जातो. कारण केंद्रीय अर्थसंकल्पातून सरकारची आर्थिक धोरणे, कर आकारणी आणि क्षेत्रनिहाय निधीच्या वाटपाची रूपरेषा जाहीर केली जाते. याचा उद्योग आणि गुंतवणूकदारांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.