कामराने माफी मागावी! फडणवीसांचा आदेश होताच हॉटेलवरही संकट! पालिका कर्मचारी हातोडा घेऊनच आले


मुंबई- स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटाने कालच स्टुडिओत प्रचंड तोडफोड केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे पाठबळ मिळाल्यावर पालिका विजेच्या वेगाने हॉटेलातही हातोडा घेऊन घुसली. ज्या हॉटेलात स्टुडिओ होता त्या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झाले आहे का हे पाहून ते आढळल्यास तिथेच ते तोडून टाकण्यासाठी पालिका अधिकारी आणि हातोडे घेतलेले सहा पालिका कर्मचारी दुपारपर्यंत हॉटेलात पोहोचले होते. हा कारवाईचा वेग थक्क करणारा होता.
हॉटेलात तोडफोडीसाठी पालिकेची कुमक पोहोचण्याआधीच हॉटेलने कामराच्या कार्यक्रमाशी आमचा संबंध नाही आणि समर्थन नाही असे अधिकृत निवेदन दिले. हॉटेलातील स्टुडिओही बंद केला. कामराच्या वादग्रस्त गीताचे आज जोरदार राजकीय पडसाद उमटले. शिंदे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा अपमान सहन केला जाणार नाही, कुणाल कामरा याने माफी मागितली पाहिजे, अशी कणखर भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. विधानसभेतही या मुद्यावर गदारोळ झाला. शिवसेना शिंदे गटाचे नेते जालन्याचे आमदार अर्जून खोतकर यांनी कामराला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. कामरा सुपाऱ्या घेऊन वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करतो, असा आरोप खोतकर यांनी केला. कामराच्या फोनचा सीडीआर तपासून त्याला कुणी सुपारी दिली का, याची चौकशी करा याचीही मागणी झाली.
खार येथील युनी काँटिनेंटल या थ्री स्टार हॉटेलमध्ये इंडी हॅबिटाट नावाच्या स्टुटिओत कुणाल कामरा याच्या वादग्रस्त गाण्याचे चित्रीकरण 2 फेब्रुवारीला झाले होते. ते काल व्हायरल झाले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगेच त्यावर प्रतिक्रिया दिली. हे गीत व्हायरल झाल्यानंतर या स्टुडिओची काल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते राहुल कनाल व 50 कार्यकर्त्यांवर खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकाळीच खार पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, युनी काँटिनेंटल हॉटेल अनधिकृत असून, त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत. त्यानंतर तासाभरात हॉटेलवर कारवाई सुरू झाली. दुपारपर्यंत अटक केलेल्या शिंदेंच्या सर्व कार्यकर्त्यांना जामीनही मिळाला.
आज या मुद्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना आणि त्यानंतर विधानसभेत निवेदन देताना फडणवीस म्हणाले की, शिंदे हे राज्यातील मोठे नेते आहेत. जनता त्यांचा आदर करते. अशा नेत्याचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाच नाही. कामराला माहीत असायला पाहिजे की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने कोण खरा आणि कोण गद्दार हे दाखवून दिले. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शिंदे यांना अपमानित करणे सहन केले जाणार नाही. कामरा ज्या राहुल गांधींच्या संविधानाची प्रत दाखवतो त्याच संविधानात असे लिहिले आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. संविधानाची प्रत दाखवून कामरा आपली चूक लपवू शकत नाही. त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कोणीही, कितीही दबाव आणला तरी कामरावर कठोर कारवाई करणार.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी कुणाल कामरा याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यांना आणि त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रात मान आहे. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. कामरावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचे घर कुठे आहे याची माहिती पोलीस घेत आहेत.
दुसरीकडे विरोधकांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केल्यावरून सरकारवर कडाडून टीका केली. ज्या शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर चालत असल्याच्या बाता शिंदे मारतात त्या बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर अनेक मोठमोठ्या नेत्यांवर अशीच व्यंगात्मक टीका केली. त्याचे भान शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राहिलेले नाही. व्यंग करणाऱ्या कामराचा स्टुडिओ तोडण्याची काय गरज होती? ही गुंडगिरी नाही तर काय आहे. कामराने काही चुकीचे केले असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी,असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. बीड, परभणी आणि नागपूर जे काही घडले ते गृहखात्याचे अपयश आहे. देवेंद्र फडणवीस हे कमजोर गृहमंत्री आहेत. त्यांना गृहखाते झेपत नाही. त्यांनी तत्काळ पद सोडावे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुणाल कामराचे जोरदार समर्थन केले. कामराने काहीही चुकीचे केले नाही. त्याने सत्य तेच सांगितले. गद्दाराला गद्दार म्हणणे हा गुन्हा ठरत नाही. मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे. काल स्टुडिओमध्ये ज्यांनी तोडफोड केली ते शिवसैनिक नव्हते. शिंदे सेनेचे गुंड होते. मुख्यमंत्री नागपूर दंगलीतील आरोपींकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची घोषणा करतात. तोच न्याय या प्रकरणातही लावून शिंदेंकडून नुकसान भरपाई वसूल करणार का, हे मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अंधारेंनी गाणे गायले
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर कामराने गायलेले गाणे म्हणत शिंदे यांची खिल्ली उडवली. आम्ही कुणाल कामराचे समर्थन करतो, असे अंधारे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन तुरुंगातून सुटका करून घेतली, असा खोटा इतिहास सांगणारा राहुल सोलापूरकर पुण्याच्या भांडारकर संस्थेमध्ये होता तेव्हा तिथे शिंदेंच्या लोकांनी हल्ला का नाही केला, प्रशांत कोरटकरवर हल्ला का नाही केला, असा सवाल अंधारे यांनी केला.
काही मागण्या…
कुणाल कामराने हिंदू देवदेवतांचा अपमान केला का? या प्रकरणी त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल करावा.
कामराने पंतप्रधान मोदींवर गाण्यात टीका केली. त्याच्यावर तेव्हाच कारवाई न करणाऱ्यांवर कारवाई करावी.
कामराने व्हिडिओचे चित्रीकरण जेथे केले ते रेस्टॉरंट अधिकृत नाही असे पालिकेने सांगितले. तरीही हे रेस्टॉरंट गेले अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यामुळे या अनधिकृत रेस्टॉरंटला ज्या पालिका अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्यावर कारवाई केली जावी.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक थेट खास पोलीस स्टेशनात दाखल झाले. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेली पोलीस गाडी त्यांच्यासोबत होती. प्रताप सरनाईक यांनी पोलीस स्टेशनला जाऊन अप्रत्यक्ष दबाव टाकल्याची तक्रार नसल्याने सरनाईक हे पोलीस स्टेशनला का गेले याची माहिती पोलिसांनी द्यावी.