उजनीचे पाणी ओसरल्याने पळसनाथ मंदिरासह ‘सैराट’च्या वाड्याचे दर्शन

सोलापूर – उजनी धरणाची पाणी मोठ्या प्रमाणावर ओसरल्यामुळे उजनी धरणामध्ये लुप्त झालेले पळसनाथ मंदिरासह ‘सैराट’ चित्रपटामधील इनामदार वाडा तसेच ऐतिहासिक पाच पूल आदींचे दर्शन आता पर्यटकांना होत आहे.
सुमारे ४६ वर्षे पाण्याखाली असलेले पळसनाथ मंदिर अद्यापही तसेच असून पळसदेव दर्शनासाठी भाविक आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाचे मंदिर प्राचीन असून सुमारे ते उजनी धरणाच्या पाण्यात लुप्त झालेले होते. मात्र उजनी धरणाचे पाणी ओसरल्यावर पळसनाथ मंदिराचे दर्शन घडते. याचबरोबर इनामदार वाडा तसेच दगडी पाचपूलदेखील नजरेस पडतो. यंदा उजनी धरणाची पाणीपातळी घटल्यामुळे पळसनाथ मंदिर पाण्याबाहेर आले असून मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांसोबतच अभ्यासकदेखील येथे येत आहेत.
ग्रामदेवतेचे हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर पळसदेव ग्रामस्थांनी पुनर्वसनानंतर नव्याने बांधले. यामध्ये प्राचीन मंदिरातील मूर्ती व शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मात्र प्राचीन मंदिराचा ठेवा तसाच ठेवला. ४६ वर्षाचा कालावधी उलटूनदेखील प्राचीन मंदिर दिमाखात उभे आहे. पुणे – सोलापूर महामार्गावरून प्रवास करताना सतत्पभूमीज पद्धतीचे शिखर असलेले हे पळसनाथाचे मंदिर सर्वांच्या नजरेला पडते. चारही बाजूने पाण्याचा वेढा पडलेले मंदिर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. सभामंडपाची अत्यंत सुरेख आणि देखणी मांडणी, गर्भ गृहामधील कोरीवकाम तसेच दगडी खांबांवर उभे ठाकलेले हे मंदिर आजही अत्यंत सुस्थितीत आहे. मंदिराच्या समोरील ओव्यऱ्यांचा काही भाग ढासळला आहे. तसेच मंदिराच्या भोवतालचा तटाचा भाग पाण्याखाली आहे. याशिवाय मंदिराच्या शिला भगनावस्थेत आहेत.
उजनी धरणाच्या निर्मितीनंतर १९७८ साली उजनी धरणात प्रथम भरल्यानंतर २४ वर्षांनी २००२ मध्ये पळसनाथाचे मंदिर पाण्याबाहेर आले होते. त्यानंतर २०१३ व २०१७ साली मंदिर पाण्याबाहेर आले. मागील वर्षीही म्हणजे २०२३ ला मंदिर पाण्याबाहेर आले होते. मागील वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मार्च महिन्यातच पळसनाथाचे हे मंदिर पाण्याबाहेर आले होते. जून महिन्यात पाऊस येईपर्यंत तरी हे मंदिर पाण्याबाहेरच राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पळसदेव मंदिरांमधील शिलालेखावरील उल्लेखानुसार हे मंदिर हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उजनी धरणातील करमाळा तालुक्यातील कुगाव परिसरात असलेला आणि उजनी धरणात लुप्त झालेला तसेच अरची व परशा यांच्या “सैराट” चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला इनामदार वाडासुद्धा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. एकूणच उजनी धरणात लुप्त झालेला इनामदार वाडा, ऐतिहासिक पाचपूल तसेच पळसदेव मंदिर आदींचे पाण्याबाहेर आलेले अवशेष पाहण्यासाठी तसेच त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि छायाचित्रे टिपण्यासाठी पर्यटकांचे पाय उजनी धरणाच्या दिशेने पडताना दिसत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top