High Security Number Plate : सरकारद्वारे जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाहनचालकांना नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.
वाहनचालकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी आणखी काही दिवस मिळणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी नवीन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले, आम्ही हा प्रक्रिया अडथळ्याशिवाय पार पडावी याची खात्री करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर अडचणी कायम राहिल्या, तर आम्ही अंतिम मुदत आणखी वाढवू शकतो.
पुण्यात 24,28,589 वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे आवश्यक असताना, आतापर्यंत फक्त 9,048 वाहनांचीच प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनेक वाहनमालकांना HSRP साठी अर्ज करताना वेबसाइटशी संबंधित समस्या असल्याची तक्रार केली आहे. mhhsrp.com वर अर्ज करताना अडचणी येत आहेत.
वाहन डेटाबेसमधून माहिती मिळवताना वारंवार त्रुटी येत असल्याचे अनेकांनी सांगितले. काहींनी वेबसाइट क्रॅश होण्याची तक्रार केली आहे, तर अनेकांनी अपॉइंटमेंट बुक करणे कठीण असल्याचे सांगितले. दरम्यान, आता वाहनमालक 30 एप्रिलपर्यंत नवीन नंबर प्लेट बसवू शकतात.