वॉशिंग्टन
अमेरिकेतील अॅरिझोना येथील सरपटणाऱ्या प्रजातींचे जतन करणारी फिनिक्स हर्पेटोलॉजिकल सोसायटी ही संस्था तामिळनाडूतून १२ मगरी आयात करणार आहे. यात सहा मगरी आणि सहा सुसरींचा समावेश आहे. यासाठी त्यांनी अमेरिकन सरकारकडे अर्ज केला आहे. यामुळे लुप्त होत चाललेल्या सरपटणाऱ्या प्रजातींचे जतन होण्यास मदत होईल, असे या संस्थेचे म्हणणे आहे.
फिनिक्स हर्पेटोलॉजिकल सोसायटीने मद्रास क्रोकोडाइल बँकमधून ३ नर, ३ मादी मगर आणि ३ नर, ३ मादी सुसर आयात करण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या सरकारला विनंती केली आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने ही आयात करण्यात येणार आहे. दरम्यान, या आयातीवर तेथील सरकारने सर्वसामान्य जनतेचा कौल मागितला आहे. यासाठी १६ ऑगस्टपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.