वॉशिंग्टन –
अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आंध्र प्रदेशातील २४ वर्षीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. साईश वीरा असे त्याचे नाव असून तो ओहियोत राहत होता. या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. तूर्त हल्ल्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर गोळ्या घालून पसार झालाअसून, घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना चोरीशी संबंधित किंवा परस्पर वादातून हा हल्ला झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे पोलिसांचे मत आहे. या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांनी आरोपीचे एक छायाचित्रही जारी केले आहे.
आंध्र प्रदेशच्या इलुरु येथील २४ वर्षीय साईश वीरा अमेरिकेत शिक्षणासोबतच गॅस स्टेशनवरही काम करत होता. काही दिवसातच तो ही नोकरी सोडणार होता. तिथेच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. साईश नोव्हेंबर २०२१ मध्ये अमेरिकेला आला होता. १० दिवसांनंतर त्याचे पोस्ट-ग्रॅज्युएशन पूर्ण होणार होते. ही घटना २० एप्रिल रोजी ओहियोच्या कोलंबस शहरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी हा मुलगा जमिनीवर पडलेला दिसला. तो गंभीर जखमी होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यातच मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. साईश वीरा आयटी च्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. सरकारने त्याला एच-१बी व्हिजा दिला होता. हा व्हिसा सामान्यतः आयटी प्रोफेशनल, आर्किटेक्चर, हेल्थ प्रोफेशनल आदी खास व्यावसायिकांना नोकरी किंवा शिक्षणासाठी दिला जातो.