वॉशिंग्टन
अमेरिकेतील आयोवा येथील पेरी शाळेत एका १७ वर्षीय मुलाने गोळीबार केला. या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटमास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना गोळीबार करणारा १७ वर्षीय हल्लेखोर देखील मृतावस्थेत आढळला. हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली असावी,असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सार्वजनिक सुरक्षा विभागाचे अधिकारी मिच मॉर्टवेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तेथे विद्यार्थी आणि शिक्षक घाबरून लपून बसले होते. अनेकजण घटनास्थळावरून पळ काढत होते. १७ वर्षीय हल्लेखोर हा त्याच शाळेचा विद्यार्थी होता. त्याचे नाव बटलर असे आहे. त्याच्याकडे पंप-अॅक्शन शॉटगन आणि लहान-कॅलिबर हँडगन सापडली. या गोळीबारात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून तो सहावीत शिकत होता. गोळीबारातील जखमींमध्ये शाळेचे मुख्याध्यापक डॅन मारबर्गर यांचाही समावेश आहे. जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर आहे. गोळीबाराच्या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.