वॉशिंग्टन – अमेरिकेची खाजगी अंतराळ संशोधन संस्था इंट्यूटिव्ह मशिन्सच्या ‘ऑडिसियस’चे चंद्रावर सुरक्षित लॅण्डिंग झाल्याने भारताच्या ‘विक्रम’ लॅण्डरला नवा शेजारी मिळाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी ‘ऑडिसियस’चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लॅण्डिंग झाल्याने चंद्राच्या या भागात उतरणारा अमेरिका दुसरा देश ठरला आहे.
‘ऑडिसियस’च्या प्रक्षेपणासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाची मदत घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी यानाचे प्रक्षेपण झाल्यानंतर त्याच्या नॅव्हिगेशन सिस्टममध्ये तांत्रिक अडचण उद्भवली. लॅण्डिंग करताना ‘ऑडिसियस’चा वेग अचानक वाढल्याने त्याला चंद्राला आणखी एक फेरी मारावी लागून लॅण्डिंगची वेळ काही मिनिटांनी पुढे ढकलली गेली. सध्या ‘ऑडिसियस’ काहीसे कमकुवत सिग्नल्स पाठवत आहे.
१९ डिसेंबर १९७२ रोजी अमेरिकेच्या अपोलो १७ मोहिमेच्या माध्यमातून अमेरिकेचे शेवटचे दोन अंतराळवीर हे चंद्रावर उतरले होते. अपोलो मोहिमे अंतर्गत अमेरिकेचे एकूण १२ अंतराळवीर हे चंद्रावर उतरले होते. तेव्हाच्या चांद्र स्पर्धेत सोव्हिएत रशियावर अमेरिकेने विजय मिळवला होता. यानंतर थेट चंद्राभोवती विविध याने जरी अमेरिकेने पाठवली असली तरी प्रत्यक्ष चंद्रावर उतरणारी कोणतीही मोहीम आखली नव्हती. आता 52 वर्षांनी अमेरिकेतील खाजगी कंपनीने ही कामगिरी करून दाखवली असून एखाद्या खासगी कंपनीने अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.