मुंबई- रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी तोडफोड केल्यावर मनसेने आता आंदोलनाचा नवीन मार्ग अनुसरला आहे. या महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनसेकडून २३ ते ३० ऑगस्ट रोजी मुंबई – गोवा महामार्गावर पदयात्रा काढण्यात येणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार असून मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. ही पदयात्रा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांत पदयात्रा काढली जाणार आहे, तर तिसऱ्या टप्प्यात मनससेकडून गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात म्हटले की, सरकारला जागे करण्यासाठी ही जागर यात्रा काढली जाणार आहे. कोणतही शहर किंवा महामार्ग असो, तिथल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सरकार गणपतीपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे आम्ही ही जागर यात्रा काढणार आहोत. या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव असणार आहे. तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. कोकणातल्या लोकांनाही यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम हाती घ्यावी, अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी केली होती. यावरुन संदीप देशपांडे यांनी कोण दिपाली सय्यद, त्या कोणत्या पक्षात आहेत, अशी खोचक टीका केली.
२३ ते ३० ऑगस्ट दरम्यान मनसेचे आता पदयात्रा आंदोलन
