नवी दिल्ली
चीनचे लु पेंग युआन यू हे मासेमारी जहाज हिंदी महासागरात बुडाले. यात जहाजातील ३९ नागरिकांनाही जलसमाधी मिळाली आहे. अथक प्रयत्नानंतरही नागरिकांना शोधण्यात अपयश आल्याने चीनने भारतीय नौदलाकडे मदत मागितली. नौदलाने त्यांच्या विनंतीला मान देत शोधकार्यासाठी बुधवारी आपले विमान तैनात केले.
भारतीय नौदलाने सांगितले की, चीनच्या विनंतीनंतर त्वरित पी ८१ विमानाने भारतापासून सुमारे ९०० समुद्री मैलांच्या दक्षिणेकडील हिंदी महासागरात नागरिकांचा शोध घेतला. यावेळी हवामान प्रतिकूल होते. विमानाने सखोल शोध मोहीम राबवताना समुद्रात बुडालेल्यांच्या सामानापैकी अनेक वस्तू शोधून काढल्या. या जहाजात १७ चिनी, १७ इंडोनेशियन आणि ५ फिलिपिनो क्रू मेंबर होते. यापैकी कोणीही अद्याप सापडलेले नाही. जहाज नेमके कोणत्या ठिकाणी बुडाले, हेदेखील चीनला सांगता आले नाही. असे असतानाही भारतीय नौदलाने बुडालेले जहाज शोधून काढले.
दरम्यान, चीनने आपले जहाज शोधण्यासाठी दोन जहाजे तैनात केली असून नौदलाची विमाने त्यांना मार्गदर्शन करत आहेत. भारताव्यतिरिक्त चीनने इतर अनेक देशांकडूनही मदत मागितली होती. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीव आणि फिलिपाइन्स हे देश चिनी जहाजाच्या शोध आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. ड्रिफ्ट मॉडेलिंगच्या आधारे १२ ,००० चौरस किमीचा महासागर धुंडाळण्यात आला आहे.