मुंबई
महाराष्ट्र सरकारने स्वच्छ शहर २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर केला. या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेने पहिला तर ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकवला. या स्थानिक स्वराज्य संस्थांना सहा गटात विभागले होते. पहिल्या क्रमांकाला १५ कोटी, दुसऱ्या क्रमांकाला १० कोटी आणि तिसऱ्या क्रमांकाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. शुक्रवारी नागरी सेवा दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली.
गट अ आणि ब मध्ये नागपूर, ठाणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. तर गट क मध्ये नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांचा अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक आला. तसेच ड गटात पनवेलला पहिला, अमरावतीला दुसरा आणि अहमदनगर महापालिकेला तिसरा क्रमांक मिळाला.
दरम्यान, नगरपरिषदेच्या अ आणि ब गटात शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, हिंगोली नगरपरिषद आणि बुलढाणा नगरपरिषदांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर सोनपाथ, नळदुर्ग आणि पांढरकवडा नगरपरिषदेला अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या महानगरपालिकांनी, नगरपरिषदांनी बाकीच्या गावांना, शहरांना मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर निर्णय फक्त कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, असे मुख्यमंत्री बक्षीस वितरणावेळी म्हणाले.