मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांकडे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांकडून संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली आहे. संजय शिरसाट ज्यावेळी वक्तव्य केले, त्यावेळी सुषमा अंधारे तेथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे संबंधित व्यक्ती समोर उपस्थिती नसल्यामुळे हा विनयभंग होत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी परळी येथे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिरसाट यांनी केलेले वक्तव्य हे संभाजी नगर येथील असल्याचे सांगत हे प्रकरण संभाजी नगर पोलिसांकडे पाठवले होते. त्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली होती. सुषमा अंधारे यांनी विनयभंग, बदनामी आणि अब्रू नुकसानीचा दावा केला होता. तर या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. या संबधीचे पत्र सुषमा अंधारे यांना चार दिवसांपूर्वी पत्र पाठवण्यात आले आहे.
दरम्यान या क्लीनचिटवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मी वारंवार सांगितले होते, मी काहीही चुकीचे वक्तव्य केले नव्हते. एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. आता तरी त्यांना समजले असावे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.