सातारा
गुरुवार बागेच्या परिसरात सापडलेले १७ व्या शतकातील एक ऐतिहासिक रांजण उत्खनन करून बाहेर काढण्यात आले. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हे रांजण सुपूर्द करण्यात आले आहे. उत्खनन केलेल्या परिसराचे संवर्धन कसे होईल याकरिता नगरपालिकेच्या सहकार्याने स्वतंत्र आराखडा बनवण्यात येईल, असे आश्वासन माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व रवींद्र झुटिंग यांनी दिले आहे.
सातारा शहराच्या गुरुवार पेठेतील गुरुवार बाग हा परिसर ऐतिहासिक म्हणून ओळखला जातो. येथे १७ व्या शतकातील शाहू महाराजांनी बांधलेला तख्ताचा वाडा प्रसिद्ध होता. आता या जागेत सातारा नगरपालिकेने समाज मंदिर बांधण्याचे नियोजित केले होते. येथील इतिहासप्रेमी कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, माजी नगरसेवक रवींद्र झुटिंग, जिल्हा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अरबाज शेख, माजी नगरसेवक सागर पावशे, नीलेश पंडित, तसेच शिवाजी ” संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे इत्यादींनी दुपारी तीनच्या नंतर उत्खनन मोहीम हाती घेतली. यावेळी त्यांना मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेला ऐतिहासिक रांजण आढळले. या रांजणाचा अभ्यास केला असता प्रवीण शिंदे म्हणाले, हा रांजण १७ व्या शतकातील असून तो वैशिष्ट्यपूर्ण भाजणीचा आहे.
तख्ताचा वाडा परिसर हा ऐतिहासिक परिसर असून येथे अजून बरेच ऐतिहासिक अवशेष सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील खाजगी बांधकामांना परवानगी न देता विविध उत्खनन मोहिमांद्वारे येथील अवशेष शोधून ते पुरातत्त्व विभागाकडे जमा केले जातील आणि या परिसराचे नगरपालिकेच्या सहकार्याने संवर्धन केले जाईल अशी माहिती रवींद्र झुटिंग दिले आहे.