बीड- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यावर विशेष पोलीस पथकाने मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदवताच परळीत कराड समर्थकांनी अक्षरशः धुडगूस घातला. बीड-परळी महामार्गावर कराड समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यात ट्रकचे टायर जाळून निषेध व्यक्त केला. तसेच दत्ता जाधव नावाच्या कार्यकर्त्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. वाल्मिकची आई पारूबाई, पत्नी, सुना यांच्यासह हजारो महिला व कार्यकर्ते यांनी संचारबंदीचा आदेश झुगारून परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. वाल्मिकला न्याय मिळत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून हटणार नाही, असा निर्धार कराड समर्थकांनी केला. पोलीस कुणालाही अडवत नव्हते, गर्दीला पांगवतही नव्हते. दरम्यान सायंकाळी धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर आज वाल्मिक कराड याची चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला केज येथील प्रथमवर्ग दंडाधिकारी न्यायालयात हजर करायचे असल्याने खबरदारी म्हणून मध्यरात्रीपासून 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती. कराडला कोर्टात हजर करणार असल्याने सकाळपासून वातावरण खूपच तणावपूर्ण बनले होते.
या हत्या प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराड वगळता उर्वरित 7 आरोपींवर दोन दिवसांपूर्वी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला. कराडवर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदविला होता. या खटल्यात त्याला देण्यात आलेल्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने सीआयडीने आज त्याला केजचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्या. एन. डी. गोळे यांच्यासमोर हजर केले. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड. जे. बी. शिंदे तर आरोपी वाल्मिक कराडच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. सरपंच देशमुख यांच्या हत्याकटात कराडचा सहभाग होता का, त्याची देशात आणि परदेशात बेहिशेबी मालमत्ता आहे का, त्याच्या तीन फोनची माहिती या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकार पक्षाच्या वतीने ॲड. शिंदे यांनी केली. सरकार पक्षाचे म्हणणे खोडून काढत आरोपी कराडच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. कराड याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. या प्रकरणाशी संबंधित सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हत्या कटात आरोपीचा सहभाग आहे किंवा नाही याचा तपास करण्यासाठी चौदा दिवसांचा पोलीस कोठडीचा देण्यात आलेला कालावधी पुरेसा आहे. त्यामुळे आणखी पोलीस कोठडी दिली जाऊ नये, असा युक्तिवाद कराडचे वकील ॲड. ठोंबरे यांनी केला. त्यांचा तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. गोळे यांनी कराड याला पोलीस कोठडी न देता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर ॲड. ठोंबरे यांनी कायद्यातील तरतुदीनुसार कराड याच्या जामिनासाठी अर्ज केला. दरम्यानच्या काळात या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. सीआयडीने वाल्मिक कराडवर मोक्काअंतर्गत हत्येच्या कटात सहभागी असल्याचा गुन्हा नोंदविला. तातडीने सीआयडीचे पथक वाल्मिक कराडला कोर्टातूनच बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात घेऊन गेले. जिल्हा आणि सत्र न्यायालयात सीआयडीने कराडच्या विरोधात मोक्काअंतर्गत खटला चालविण्याची परवानगी मिळण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला. सत्र न्यायालयाने ती विनंती तत्वतः ग्राह्य धरल्याने मोक्का अंतर्गत खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे सत्र न्यायालयाने तूर्त कराड याला सीबीआयच्या ताब्यात दिले. आज रात्री कराड सीबीआय कोठडीत राहील, उद्या पुन्हा नियमित प्रक्रियेसाठी त्याला जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) कराडचा ताबा देण्याची मागणी सत्र न्यायालयात करणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कराडवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल होत असल्याचे वृत्त कळताच कराड यांचे समर्थक संचारबंदीचे आदेश मोडून हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. परळी शहरात मोठी रॅली काढण्यात आली. रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. शेकडो कराड समर्थक राणी लक्ष्मीबाई चौकातील टॉवरवर चढले. त्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला. तर सायंकाळी दत्ता जाधव नावाच्या कार्यकर्त्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.त्यात त्याचे पाय जळाले. त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान सायंकाळी धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर ते परळीला रवाना झाले.
दुसरीकडे कराडवर मोक्का लावण्यात यावा या मागणीसाठी गेला महिनाभर सातत्याने प्रयत्न करत असलेले भाजपा आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना प्रतिकात्मक श्रध्दांजली वाहून त्यांच्या फोटोंना जोडे मारले. धस आणि क्षीरसागर राजकारण करीत असून, त्यांचीच चौकशी करा, अशी मागणी केली. त्यामुळे शहरात तणाव अधिकच वाढला. व्यापाऱ्यांनी ऐन संक्रांतीच्या दिवशी दुकाने बंद करून कडकडीत बंद पाळला. महाराष्ट्राचे राजकारण गेला सुमारे महिन्याभर ढवळून काढणाऱ्या या हत्या प्रकरणात याआधी पोलिसांनी मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे अशा सात आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यापैकी कृष्णा आंधळे वगळता सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आज वाल्मिक कराड याच्यावरही हत्येचा कट रचल्याप्रकरणी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने या खटल्यात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या एसआयटीमधील पोलीस अधिकाऱ्यांवर आरोपी कराडला मदत करत असल्याचे आरोप होऊ लागल्याने काल एसआयटीचे प्रमुख वगळता एसआयटीतील सात पोलीस अधिकारी सरकारने बदलले आहेत.
कराडच्या आईच्या सोन्याच्या
पाटल्यांची समाजमाध्यमांत चर्चा
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आई पारुबाई यांनी आपल्या मुलासाठी परळीत आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पारुबाईंनी हातात घातलेल्या सोन्याच्या पाटल्यांची समाजमाध्यमांत चर्चा झाली. समाजसेवक वाल्मिक कराडच्या आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या बघून तरी ईडीला समाजसेवकाची दया आली पाहिजे, असे एका युजरने त्यांचा फोटेो टाकत लिहिले.
संचारबंदी असूनही परळीत कराड समर्थकांचा धुडगूस! बाजार बंद! जाळपोळ! आई, पत्नीसह हजारोंचे धरणे
