मुंबई- भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षासमोर ६०० चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच या मत्स्यालयात साडेपाच हजार चौरस फूट जागेत दोन वॉक थ्रू टनेल बांधले जाणार आहे. त्याचा उपयोग पर्यटकांना ये-जा करण्यासाठी होणार आहे. तसेच देशी विदेशी रंगीबेरंगी मासे पर्यटकांचे आकर्षण ठरणार असून या कामासाठी ६० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
राणी बागेच्या प्राणिसंग्रहालयात विविध प्रकारचे पशू-पक्षी व प्राणी असून याठिकाणी दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देत असतात. त्यात पेंग्विन पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही वर्षांत मत्स्यालय पर्यटकांसाठी खुले होणार आहे. या मत्स्यालयात येणाऱ्या पर्यटकांना खरेदीसाठी सुव्हिनियर शॉपची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. कपडे, किचेन, लहान मुलांसाठी खेळणी खरेदी करता येणार आहे. या मत्स्यालयातील पारदर्शक काचांचे १४ मीटर आणि ३६ मीटरचे असे दोन बोगदे, देशी-विदेशी रंगीबेरंगी मासे पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. त्याचप्रमाणे या मत्स्यालयामुळे पेंग्विन कक्षाशेजारी उपलब्ध जागेत ६० मीटरने वाढ होणार आहे त्यामुळे पेंग्विनसाठी २२५ मीटर जागा उपलब्ध होणार आहे.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







