मुंबई-राज्याच्या जवळजवळ सर्वच भागात आज चांगलाच पाऊस झाला. सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. राज्यातील अनेक धरणे भरली असून नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत.सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात आज जोरदार पाऊस झाला. कोल्हापूरातील पावसाने पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहात असून राधानगरी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात असून कृष्णा व वारणा या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. पलुस तालुक्यातील औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याने या मंदिरात जाण्यास बंदी घालण्यात आली. उरमोडी धरणही भरल्याने लावंघर मस्करवाडी पुलावर पाणी आले आहे. महाबळेश्वर तापोळा मार्गावर डोंगराचा एक भाग कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पुणे जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला असून खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहात आहे. लोणावळ्यातही विक्रमी पाऊस झाला आहे. इंद्रायणी नदीलाही पूर आला आहे.मुंबईच्या शेजारील कल्याण, डोंबिवली, दिवा या भागातही जोरदार पाऊस झाला. भिवंडी शहरातील बाजारपेठेतही पावसाचे पाणी शिरले. पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे धामणी धरण भरले असून या धरणातून सूर्या नदीत ३२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमधील सर्व तालुक्यात मोठा पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धबधबेही वाहायला सुरुवात झाली आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठाही वाढला आहे. जळगावात पावसामुळे डालकीची धार धबधबा वाहू लागला आहे.कोकणातही चांगलाच पाऊस झाला असून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गातही चांगलाच पाऊस सुरु आहे. विदर्भात मात्र पावसाने गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः थैमान घातले असून गडचिरोलीतील अनेक गावात पाणी शिरले आहे. भंडाऱ्यातील पावसाने महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील संपर्क तुटला आहे. गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरु झाल्याने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे भंडारा शहरातही पाणी आले आहे. सखल भागातील व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोंदिया जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेने धोक्याची पातळी गाठली आहे. अमरावती जिल्ह्यात निम्न वर्धा धरणाचे दरवाजे ३० सेमीने उघडल्याने नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा शहरात पाणी भरले असून कळंबा तलाव भरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पाढरकवडा तालुक्यात खुनी नदी दुथडी भरून वाहात आहे. राज्यातील हा पाऊस पुढील काही दिवस सुरु राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यभर जोरदार पावसाची हजेरी सातारा सांगली विदर्भात थैमान
