मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत युतीला दणदणीत यश मिळून 72 तास उलटले तरी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे, असा आग्रह शिंदे गटाच्या आमदारांचा आहे. केसरकर, उदय सामंत हे जाहीरपणे म्हणाले की, मोदी आणि शहा दिल्लीत जो निर्णय घेतील तो मान्य आहे. मात्र या विषयावर स्वतः एकनाथ शिंदे यांनी पूर्ण मौन बाळगले आहे. याचा अर्थ त्यांनी अजूनही मुख्यमंत्री पदावरील दावा सोडलेला नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री जाहीर होण्यास विलंब होत आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी फडणवीस यांच्या नावाला जाहीर पाठिंबा दिला आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री घोषित करून 29 डिसेंबरला शपथविधी होईल असेही सांगितले जाते. मात्र एकनाथ शिंदे अजून राजी झाले नसल्याने सगळाच विलंब होत आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रिय मंत्रिमंडळात मंत्रिपद, त्यांचा पुत्र श्रीकांत शिंदेला राज्यात उपमुख्यमंत्रिपद हा प्रस्ताव दिला होता तो शिंदेंनी फेटाळला, अशी चर्चा आहे. शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती हा प्रस्ताव दिला तोही त्यांनी फेटाळला, असेही सांगितले जाते. तूर्त हा पेच लवकर सुटण्याची शक्यता धूसर असून, डिसेंबरपर्यंत चर्चेचे गुर्हाळ सुरूच राहील, असे जाणकार सांगतात.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर सर्वाधिक 131 जागा जिंकणार्या भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार ही औपचारिकता समजली जात होती. मात्र, शिवसेनेच्या विविध नेत्यांनी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांनाच कायम ठेवावे, अशी मागणी सुरू केली. महायुतीने विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढली, असे भाजपाच्या नेत्यांनीच सांगितले आहे. शिवाय शिंदे यांनीच लाडकी बहीण योजना आणली. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत इतके मोठे यश मिळाले, असे म्हणत शिवसेना नेत्यांनी मागणी लावून धरली. भाजपाने ही मागणी सपशेल अमान्य केल्यावर शिवसेनेकडून अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला. तोही धुडकावण्यात आल्यावर शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले. लाडक्या बहिणी, आरोग्य सेवा, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थींना पुढे करून शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी करण्यात आली. काल व आज राज्यभर विविध मंदिरांमध्ये शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी महाआरती, पूजाअर्चा करण्यात आली. शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी वातावरण निर्मिती करीत दबाब आणण्याचा प्रयत्न सुरू झाला.
आज मुख्यमंत्री शिंदे हे राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण करण्यापूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शिवसेनेची योजना होती. त्यासाठी ठाणे, मुंबईत विभागप्रमुखांकडून कार्यकर्त्यांना वर्षा निवासस्थानी जमण्याचे आदेश देण्यात आले होते. पण ही आक्रमक भूमिका काल मध्यरात्रीपासून अचानक बदलली. मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यरात्री 12.53 मिनिटाने एक्सवरून सांगितले की, कार्यकर्त्यांनी माझ्या मुख्यमंत्रिपदासाठी वर्षा किंवा अन्य कुठे जमू नये. महायुती भक्कम असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही आज सौम्य झाली. दीपक केसरकर यांना आज पत्रकारांनी, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या पक्षाचाच मुख्यमंत्री व्हावा ही प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना असते. मात्र तिन्ही पक्षांनी स्पष्ट सांगितलेले आहे की, जो निर्णय मोदी आणि शहा घेतील तो सर्वांना मान्य राहील. शिंदे हे नाराज नसून त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की, जो निर्णय मोदी आणि शहा घेतील, तो मान्य असेल.
मात्र शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, जास्त पक्षाचे आमदार येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल किंवा कमी आमदार आलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार नाही, असे काही ठरलेले नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होऊन आणि आमचे वरिष्ठ नेते मोदी, अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यावर मुख्यमंत्री कोण हे जाहीर होईल. शिंदेचा चेहरा घेऊन आपण ही निवडणूक लढलो आहोत. त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची मागणी होत आहे. त्यांनी आणलेल्या योजना यशस्वी झाल्या आहेत. सर्व्हेतही त्यांना जास्त पसंती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे नाव सुचवण्यात काही गैर नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही काही वेगळे नाही. त्यांना जास्त जागा जिंकल्याने त्यांना मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी होत आहे. आमदार, नेते, कार्यकर्ते यांच्या भावना आहेत. पण तरी पालिका निवडणुका आणि इतर गोष्टी पाहता एकनाथ शिंदे सक्षम आहेत. म्हणून त्यांच्या नावाला जास्त पसंती मिळत आहे. तरीही वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
शिंदे कार्यकर्त्यांकडून पूजापाठ
राज्यात अनेक ठिकाणी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून आज पूजा करण्यात आली. नाशिक, रायगड, चंद्रपूर, पुणे या जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी पूजा आयोजित करण्यात आली. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात शिंदे गटाने माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात महाआरती व महापूजा केली. रायगडच्या महाडमध्ये लाडक्या बहिणींनी ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांकडे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून साकडे घातले, चंद्रपूर जिल्ह्यात शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी होमहवन केले. तर आळंदीमध्ये शिंदे गटाकडून महायज्ञ संपन्न झाला.