मुंबई- गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी काल पुकारलेला संप आज कामगार संघटनांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मागे घेतला. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ करण्यासह काही मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. त्यामुळे एसटी कामगारांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.मात्र एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची कर्मचार्यांची मागणी यावेळीही पूर्ण झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हेच आश्वासन देण्यात आले होते. तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब कराराचा कागद हातात घेऊन कामगारांना कॅल्क्युलेशन समजावून सांगतो असे म्हणत होते. पण तेव्हा संपकऱ्यानी त्यांचे ऐकले नव्हते.
आज सह्याद्रीवर कामगार संघटनांच्या कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंतही हजर होते. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळही उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांनी सात हजार रुपयांची वेतनवाढ मागितली होती. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांच्या मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ करण्याची मान्य करण्यात आली. ही वेतनवाढ 2020 पासून लागू होणार आहे. पुढील महिन्याच्या पगारापासून ती मिळणार आहे. याशिवाय 2020 ते 2024 पर्यंतची वाढीव वेतनवाढीची थकबाकी दिली जाणार आहे. 2016 पासूनचा मूळ करार कायम राहाणार असून त्याचीही थकबाकी दिली जाणार आहे.
वेतनवाढीची घोषणा होताच एसटी कर्मचार्यांनी गुलाल उछळून एकच जल्लोश केला. या बैठकीनंतर कृती समितीचे नेते संदीप खरात यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी मूळ वेतनात साडेसहा हजार रुपये वाढ करण्याची तसेच कॅशलेस मेडिकल सुविधा , कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाना एक वर्षाचा मोफत प्रवासाचा पास देण्याचे मान्य मान्य केले आहे. 1 एप्रिल 2020 चा जो मूळ करार आहे तो तसाच राहणार आहे .तसेच गेल्या दोन संपकाळातील कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. तसेच दोन वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जातील.निलंबित कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतले जाईल. तसेच आगाराच्या नूतनीकरणासाठी 500 कोटी दिले जाणार आहेत. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमची जी वेतनवाढीची मागणी होती त्यासाठी आमचा लढा सुरुच राहणार आहे.