मुंबई – मुंबईसह कोकणात पुढील पाच ते सहा दिवस चक्रीवादळाचे संकट घोंघावणार आहे. त्यामुळे शनिवार व रविवार येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 2021 साली कोकणाला असेच पावसाने झोडपले होते. ज्यात अनेक मृत्यू झाले आणि असंख्य घरांचे नुकसान झाले. सुदैवाने यावेळी चक्रीवादळ असले तरी ते दुरून जाणार असल्याने पाऊस मोठा होईल, पण फटका कमी बसेल. तरीही सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात आज तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढील 24 तासांत वादळात रुपांतर होणार आहे. ‘बिपरजॉय’ हे या वादळाचे नाव असून, त्याच्या प्रभावामुळे ताशी 90 कि.मी. पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मागील ‘निसर्ग’ चक्रीवादळाप्रमाणे हे वादळ थेट महाराष्ट्रात धडकणार नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मुंबई आणि कोकणातील किनारपट्टी भागात राहणार्या नागरिकांसह मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रावर आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील 24 तासात उत्तरेकडे सरकण्याचा आणि त्याचे वादळात रुपांतर होण्याचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ 8, 9 आणि 10 जूनला तीव्र होणार आहे. यावेळी समुद्र खवळलेला असेल आणि वार्यांचा वेग ताशी 90 किमी इतका असू शकेल. आतापर्यंतच्या इतिहासात ‘टिप’ हे वादळ सर्वात शक्तिशाली होते, असे म्हटले जाते.
वादळाचे बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले आहे. कोकणासह, मुंबई, पालघर आणि गुजरातच्या किनारपट्टी भागाला या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. वार्यांचा वेग आज रात्रीनंतर 45 ते 55 किमी प्रतितास असणार आहे. 7 जून रोजी तो 60 ते 80 किमी प्रतितास होईल आणि 8 जूननंतर 90 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकेल, असे हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. शनिवार-रविवारी म्हणजे 10 आणि 11 जूनला मुंबई आणि कोकण भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हा वादळी पाऊस होणार असला तरी तो मान्सूनपूर्व असेल. या चक्रीवादळामुळे मान्सून लांबणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र मान्सूनबाबत हवामान विभागाने कोणतीही माहिती
दिलेली नाही.
कोकणातून पुढे मुंबई, ठाण्यालगत किनारपट्टीवरून पुढे सरकत हे वादळ गुजरातहून पाकिस्तानच्या दिशेने वळेल. प्रत्यक्ष महाराष्ट्रात धडकणार नसल्याने मोठ्या प्रमाणावर फटका बसणार नसला तरी वादळी वार्यांसह मुसळधार पाऊस मात्र मुंबई, कोकणाला झोडपून काढू शकतो. त्यामुळे मुंबईतल्या सखल भागातील रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. अरबी समुद्रात तयार होणार्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रायगड जिल्हाधिकार्यांनी परिपत्रक काढत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
2020 साली जूनला निसर्ग आणि 2021 साली जुलै महिन्यात तौक्ते चक्रीवादळ व मुसळधार पाऊस यामुळे रायगड-रत्नागिरीला अक्षरश: झोडपले गेले होते. घरे, झाडांची मोठी पडझड झाली होती. परशुराम घाटात दरड कोसळली होती. सावित्री नदीला पूर आला होता. चिपळूण शहरात अक्षरशः चिखल झाला होता. अनेकांचा मृत्यू झाला. फार मोठी वित्तहानी झाली. सावित्री नदीत साचलेला गाळ उपसला न गेल्याने यंदाच्या वादळाचाही येथे फटका बसण्याची भीती स्थानिक
वर्तवत आहेत.
वादळाच्या स्थितीबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, ‘अरबी समुद्रात तयार झालेल्या वार्यांच्या चक्राकार स्थितीचे स्थान सध्या मुंबईपासून 1100 किमीवर आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राते रुपांतर 24 तासात चक्रीवादळात होईल. मात्र त्याचा प्रवास उत्तरेच्या दिशेने आणि किनारपट्टीपासून 1000 ते 1100 किमी दूर सरळरेषेत असेल. त्यामुळे त्याचा थेट धोका मुंबई, कोकणाला नाही. मात्र वादळी वारे आणि पावसाच्या दाट शक्यतेमुळे किनारपट्टी भागातील नागरिक तसेच मच्छीमारांना राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या वार्यांचा वेग 40 ते 50 कि.मी. प्रतितास आहे. मात्र 8 ते 10 जून दरम्यान याची तीव्रता 60 किमी प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राचा किनारपट्टी समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी या क्षेत्रात जाऊ नये.’
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज केरळसाठी 10 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कर्नाटकच्या दक्षिण भागातही 9 आणि 10 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच लक्षद्वीप, अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि मिझोरामला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
समुद्रकिनारे अलर्ट
कोकण किनारपट्टीवर हवामान खात्याने चक्रीवादळी पावसाचा मोठा इशारा दिला असल्याने सर्व मासेमारी नौका किनार्यावर लावण्यात आल्या आहेत. मात्र पहिला पाऊस अंगावर झेलण्यासाठी मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटक आले असले तरी संख्या फारशी नाही, अशी माहिती येथील लॉजिंग मालक मनोहर बैले यांनी दिली. मात्र वादळी इशार्यामुळे समुद्रकिनारी पर्यटकांसाठी यांत्रिक बोटीच्या सर्व जलक्रीडा बंद करण्यात आल्याचेही ते म्हणाले. सर्वच समुद्रकिनारी समुद्रातील वॉटर स्पोर्ट्स, जलक्रीडा आदि शासनाच्या आदेशानुसार तातडीने बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मुरूड, काशीद, नांदगाव आदी किनार्यावर तुरळक प्रमाणात पर्यटक फिरताना दिसून आले.