रायगड- जिल्ह्यातील तळा शहरासह तालुक्यात माकडांच्या कळपाने आणि जंगली प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे.तरी वनविभागाने २१ ऑक्टोबरपर्यंत या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केला नाही तर खेळण्यातील माकड देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा तळा तालुका विकास आघाडीने दिला आहे.
तालुक्यात दिवसेंदिवस माकडाची पैदास वाढत चालली आहे.त्यांचे राहणीमान जंगल सोडून मानवी वस्तीत आल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ही माकडे घरांची कौले काढून बंद घरात नासधूस करत आहेत.तसेच ही माकडे भाजीपाला,फळे,कडधान्ये,सुकायला घातलेली कपडे पळवून नेत आहेत.तर दुसरीकडे रानडुकरे भातशेती नष्ट करत आहेत. शेतकरीवर्ग आणि लहान मुले माकडांमुळे हैराण झाली आहेत.त्यामुळे या वन्यप्राण्यांचा २१ ऑक्टोबरपर्यंत बंदोबस्त केला नाही तर माणगावच्या वनविभाग अधिकार्यांना खेळण्यातील माकड देऊन आंदोलन केले जाणार आहे. तसे निवेदन त्यांना देण्यात आले आहे.