वॉशिंग्टन
अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जूड चाको (२१) असे या विद्यार्थ्याचे नाव होते. रविवारी (स्थानिक वेळेनुसार) कामावरून परत येत असताना काही अज्ञातांनी जूड याच्यावर गोळ्या झाडल्या. जूड याचे वडील सुमारे ३० वर्षांपूर्वी केरळहून अमेरिकेत स्थायिक झाले होते. जूडचा जन्मही अमेरिकेतच झाला होता.
शिक्षणासोबतच जुड पार्ट-टाईम नोकरीही करत होता. रविवारी कामावरून घरी परतताना काही अज्ञात हल्लेखोरांनी जूडला अडवले. लुटण्याच्या उद्देशाने त्याच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या होण्याची ही वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी आंध्र प्रदेशच्या एका २४ वर्षीय विद्यार्थ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ही घटना २१ एप्रिल रोजी घडली होती. साईश वीरा असे या विद्यार्थ्याचे नाव होते. ओहायोमधील एका पेट्रोल पंपावर तो पार्ट-टाईम काम करायचा. याच पेट्रोल पंपावर त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता.