पुणे:
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रिया बेर्डे यांनी पहिल्यांदाच भाजपात प्रवेश करण्यामागचे स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना खूपच मर्यादा होत्या. भाजपात मला काम करण्यास वाव मिळाला. मी त्याच कारणाने भाजपात आले, असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, आत्तापर्यंत सांस्कृतिक विभाग नेहमीच दुर्लक्षित होता. या विभागाला फक्त प्रचारापुरते गृहित धरले जायचे. मात्र आता असे होणार नाही प्रत्येक कलाकाराला न्याय मिळेल. राज्यातील नाट्यगृहाची स्थिती अधिकच चांगली व्हावी यासाठी संबंधित खात्याची मंत्र्यांनी २५ कोटी रुपयांचा निधी देखील दिला आहे.
दरम्यान प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर घड्याळ बांधले होते. परंतु, अवघ्या दोनच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.