लंडन :
ब्रिटनमध्ये बुली एक्सएल जातीच्या कुत्र्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. हा निर्णय येत्या वर्षअखेरीपर्यंत घेण्यात येईल, असे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जाहीर केले. या जातीच्या कुत्र्याचे सरासरी वजन ६० किलोपर्यंत असते.
या जातीच्या कुत्र्यांनी अलीकडे अनेक प्राणघातक हल्ले केले आहेत. या आठवड्यात स्टॅफोर्डशायरमधील एका व्यक्तीचा एक्सएल बुली जातीच्या कुत्र्याने हल्ला केल्याने मृत्यू झाला. या शिवाय गेल्या काही दिवसांपूर्वी याच जातीच्या कुत्र्याने ११ वर्षीय मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते.
ब्रिटनमध्ये या जातीच्या कुत्र्यांचे वाढते हल्ले पाहून अनेक लोक त्यावर बंदी घालण्याची मागणी करत होते. यानंतर ऋषी सुनक यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ संदेश जारी करून याची घोषणा केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कुत्र्यांचे जे अलीकडील हल्ले झाले, त्यात कुत्र्यांची जी प्रजाती होती त्याची कायदेशीर व्याख्या करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून धोकादायक श्वान कायद्यांतर्गत त्यावर बंदी घालता येईल. कारण सध्याच्या कायद्यात ही परिभाषित जाती नाही.