फिलिपाईन्समध्ये यागी चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत १४ जणांचा मृत्यू

मनिला – फिलिपाईन्सला यागी चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला असून येथील पुरामुळे १४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिक भाषेत इंटेगा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चक्रीवादळाचा फटका फिलिपाईन्सच्या ईशान्येकडील शहरांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.फिलिपाईन्सच्या कासीगुरान शहरात वाहणारे सोसाट्याचे वारे व मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले असून घरामध्ये पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतर करावे लागले. या शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लुझॉन व मनिला या शहरांमध्येही मोठा पूर आला. तर अँटीपोलो व केबू भागात दरड कोसळली. काही भागात पुराच्या पाण्यात अनेक जण वाहून गेल्याची भीती आहेत. फिलिपाईन्समध्ये पूरस्थितीमुळे १४ जणांचा बळी गेला आहे. मरीकाना भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. फिलिपाईन्समधील शाळा व सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

मारिकीना नदीची पातळी वाढल्याने या ठिकाणी तटरक्षक दलाने काविट व सामर या शहरांत बचावकार्य सुरु केले. अनेक गावकऱ्यांना रबरी बोटीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यागी चक्रीवादळामुळे समुद्रातही महाकाय लाटा उसळत आहेत. यामुळे फेरीबोटीतून प्रवास करणारे साडेतीन हजार प्रवासी अडकून पडले. वादळामुळे किनाऱ्यावर असलेल्या दोन बोटींची टक्कर झाली. त्यातील एका बोटीला आग लागली. या बोटीवरील १८ कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. वादळामुळे फिलिपाईन्समधील विमानसेवाही ठप्प झाली आहे. बुलाकन धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे धरणातून पाण्याचा नियंत्रित विसर्ग करण्यात आला. फिलिपाईन्स हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरमधील भाग असल्याने इथे चक्रीवादळ, भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक नेहमीचे आहेत. दरवर्षी या ठिकाणी किमान २० चक्रीवादळे धडकत असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top