नवी दिल्ली –
अरबी समुद्रात थैमान घातलेल्या बिपरजॉय वादळामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रचंड नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवे चक्रीवादळ घोंगावत आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामुळे कोकण, गोव्यासह देशातील १२ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक किनारपट्टीच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या ठिकाणी एकूण ११५.६ मिमी ते २०४.४ मिमी पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, हिमाचल प्रदेश, राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ६४.५ मिमी ते ११५.५ मिमी पाऊस अपेक्षित आहे. सध्या काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पाऊस ओसरल्याचे चित्र आहे, मात्र आता पुढील चार दिवस मान्सून अतिशय तीव्र होणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असून, यामुळे एकूण १२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओदिशाच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच तेलंगणामध्ये लोकांना पुढील ३ दिवस विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर भारतातील डोंगराळ भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या इशाऱ्याच्या वर जाणार आहे. दरम्यान, गंगा नदीलाही उधाण आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पुराचा धोका निर्माण झाला आहे.