बिजिंग –
व्लादिमीर पुतीन रशियाचे पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर गुरुवारी चीनमध्ये पोहोचले. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ९ दिवसांच्या आत त्यांनी ही भेट दिली आहे. पुतीन हे दोन दिवस चीनमध्ये राहणार आहेत. चीनमध्ये पोहोचल्यानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतीन यांचे रेड कार्पेटवर स्वागत केले. यादरम्यान सोव्हिएत काळातील सूर वाजवले गेले.
पुतीन आपल्या दौऱ्यात युक्रेन युद्धात चीनला सतत पाठिंबा देण्याची मागणी करतील. याआधी त्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये चीनला भेट दिली होती. रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले होते की, त्यांच्या परस्पर भागीदारीला मर्यादा नाही. मार्च 2023 मध्ये जिनपिंग यांनी मॉस्कोला भेट दिली तेव्हा ते म्हणाले होते की, ही दोन्ही देशांमधील नवीन युगाची सुरुवात आहे.