काझीरंगा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस आसाम आणि अरुणाचल प्रदेशात होते. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान ते हत्तीवर बसून जंगल सफारीला गेले. यानंतर जीपमधून नॅशनल पार्कलाही भेट दिली. यावेळी उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि वरिष्ठ वन अधिकारीही त्यांच्यासोबत होते.
पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम उद्यानाच्या सेंट्रल कोहोरा रेंजमधील मिहिमुख भागात हत्तीवरुन जंगल सफारी केली. यानंतर त्यांनी याच रेंजमध्ये जीप राईडचा आनंदही घेतला. मोदींनी जंगल सफारीदरम्यान प्राण्यांचे फोटोही काढले. एक्स वर ही छायाचित्रे पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, प्रत्येकाने या राष्ट्रीय उद्यानात यावे. त्यांनी हत्तींना ऊस खाऊ घालतानाचा फोटोही पोस्ट केला. त्यांनी लिहिले की हे ठिकाण गेंड्यांसाठी ओळखले जाते, परंतु येथे हत्तींची संख्याही जास्त आहे.