काठमांडू – नेपाळ सरकारने एव्हरेस्ट व इतर शिखरांच्या गिर्यारोहणाचे परवाना शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या परवाना शुल्काची ३५ टक्के वाढ करण्यात आली असून येत्या सप्टेंबर पासून हे नवे शुल्क आकारले जाणार आहे. अधिक प्रतिसादाच्या काळात व कमी प्रतिसादाच्या काळात हे शुल्क वेगवेगळे राहणार आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच हे शुल्क वाढवण्यात आले आहे.एव्हरेस्ट व इतर शिखरांवरील गिर्यारोहणच्या शुल्कातून आर्थिक अडचणीत सापडलेल्या नेपाळला मोठे उत्पन्न मिळत असते. नेपाळ दरवर्षी ३०० परवाने देत असते. यापुढे गिर्यारोहकांना १५ हजार अमेरिकन डॉलर्स भरावे लागणार आहेत. या आधी त्यांना ११ हजार परवाना शुल्क द्यावे लागत होते. एप्रिल ते मे महिन्यासाठी हे शुल्क वेगळे असून सप्टेंबर ते नोव्हेंबर या कमी प्रतिसादाच्या काळात ते वेगळे असेल. आम्हाला या परवाना शुल्काच्या वाढीची कल्पना होती असेही गिर्यारोहकांनी म्हटले आहे. काही गिर्यारोहण संस्थांनी म्हटले आहे की, नेपाळ शुल्क घेते मात्र शिखरांच्या स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष देत नाही. शिखरांवर अनेक ठिकाणी कचरा साठला आहे. सध्या जागतिक तापमान वाढ व बदलत्या पर्यावरणामुळे शिखरांवरील बर्फही मोठ्या प्रमाणात वितळले असून अनेक शिखरे केवळ खडकांची राहिली आहेत. नेपाळ गरजेपेक्षा अधिक परवाने देत असल्याची तक्रारही गिर्यारोहकांनी केली आहे.
नेपाळने वाढवले एव्हरेस्ट गिर्यारोहणाचे परवाना शुल्क
