नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेने आपला रेपो दर हा मुख्य व्याजदर दोन वर्षापासून ६.५ टक्के या उच्चांकी पातळीवर ठेवूनही महागाई नियंत्रणात येण्याची चिन्हे नाहीत.ऑक्टोबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईच दराचा भडका उडून तो ६.२१ टक्के या पातळीवर गेला आहे. रिझर्व बँकेने ही महागाई चार टक्क्याच्या आत रोखण्याचा संकल्प केला आहे. अन्नधान्याच्या किंमती १०.८७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.अशा परिस्थितीत डिसेंबरमध्ये व्याजदर कपातीची शक्यता मावळली आहे.
सप्टेंबर महिन्यात या महागाईचा दर ५.४९ टक्के होता. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील पतधोरणात व्याजदर ६.५ टक्के या पातळीवर कायम ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर बऱ्यापैकी नियंत्रणात म्हणजे ४.८७ टक्के या पातळीवर होता.
महागाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते की अन्न घटकाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकूण महागाईतील अन्न घटकांची महागाई ऑक्टोबर महिन्यात वाढून १०.८७ टक्के या पातळीवर गेली आहे. सप्टेंबर महिन्यात अन्न घटकांची महागाई ९.२४ टक्के इतकी होती. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ६.६१ टक्के इतकी होती.सध्याचा किरकोळ किमतीवरील महागाईचा दर १४ महिन्यांच्या उच्चाकी पातळीवर आहे.