*ग्रामदेवतेवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
पुणे
चित्रपट निर्माते आणि देवमाणूस मालिकेतील ‘लाला’ म्हणजेच डॉ. शशिकांत डोईफोडे यांचा २२ वर्षीय मुलगा वैमानिक झाला. त्याचे नाव चिराग डोईफोडे असे आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी ग्रामदेवतेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली.
चिरागला बालपणापासून वैमानिक होण्याची इच्छा होती. त्याचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण माण तालुक्यातील पळशी मधील जिल्हा परिषद शाळेत झाले. बारावीनंतर त्याने डीजीसीएअंतर्गत विविध परीक्षा दिल्या. या स्पर्धा परीक्षांमध्ये चिराग दीड ते दोन वर्षांमध्येच उत्तीर्ण झाला. दिल्ली, बारामती, आसाम, बंगळुरू येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मागील आठवडय़ातच त्याला कमर्शिअल पायलटचा परवाना मिळाला. त्यामुळे चिराग आता गगनभरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, चिरागच्या या गरुड झेपेमुळे त्याच्या आई- वडिलांना अत्यानंद झाला. त्यांनी हा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्रामदेवतेवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. या अनोख्या पुष्पवृष्टीची सर्वत्र चर्चा होत आहे.