कोरेगाव – सातारा जिल्ह्यातील राजमा पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या कोरेगावात दुबारा पेरणीच्या धर्तीवर एकच दस्त दोन वेळा नोंदणी करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी व अन्यायग्रस्त दलित समाजातील खंडाईत कुटुंबीयांनी उद्या रविवार २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तालुक्यातील मौजे शिरढोण येथील खंडाईत कुटुंबातील सदस्यांच्या जमिनीबाबत १९८५ पासून प्रलंबित दिवाणी न्यायालयाचा जमिनीचा वाद आहे. मात्र या न्यायप्रविष्ठ जमिनीच्या बेकायदेशीर दस्ताची खरेदी विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दस्त नोंदणी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. बेकायदेशीर दस्त करणाऱ्या व्यक्ती व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा उद्या २६ जानेवारी रोजी कोरेगाव उप विभागीय अधिकारी तथा प्रांत कार्यालयाबाहेर खंडाईत कुटुंब आमरण उपोषण करणार आहेत. शिरढोण येथील दलित कुटुंब कायम रहिवासी असून त्यांच्या घरातील जमिनीचे वाटप झालेले नाही. तरीदेखील त्यांच्या परस्पर जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार झाला आहे.