धाराशिव – तुळजापूरच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी मंदिराचा कायापालट होणार आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिर परिसरात नुतनीकरण व विविध विकास कामास मंदिर संस्थानकडून सुरुवात झाली आहे. यासाठी मंदिर समिती स्वनिधीतून सुमारे एकूण ५८ कोटी १२ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तीन टप्प्यांमध्ये ही विकास कामे होणार असून, यावेळी मंदिर परिसरातील काही वास्तू हटवण्यात येणार आहेत. यासाठी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की, तुळजाभवानी मंदिर मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजमाता जिजाऊ आणि राजे शहाजी महाद्वाराचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. ऑडिट अहवालानुसार बांधकाम टिकण्याची क्षमता लक्षात घेवून नवीन महाद्वाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ऑडिट अहवाल नकारात्मक असल्यास दोन्ही महाद्वार पाडून १०८ फूट नवे महाद्वार बांधण्यात येईल. तर ऑडिट अहवाल सकारात्मक असल्यास दोन्ही महाद्वारांमध्ये नवे महाद्वार बांधण्यात येईल. श्री तुळजाभवानी मंदिर सभामंडपाचा काही भाग पूर्ण पाडून, पुन्हा नव्याने मजबूत केला जाणार आहे. मंदिर परिसर मोकळा करण्यात येणार असून देवीच्या दर्शनासाठी येणार्या ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी भविष्यात लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्था केली जाणार आहे. देशभरातून येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन मंदिर जीर्णोध्दार कामाचे नियोजन केले असून, पुढील वर्षभरात मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.