ठाणे- खारघरच्या खुल्या मैदानात आयोजित ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात श्री सेवकांचा मृत्यू झाल्याने आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर एक सदस्य चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र या कार्यक्रमाच्या आयोजनाचे कंत्राट ज्या लाईट ॲण्ड शेड्स कंपनीला दिले होते त्या कंपनीत शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांची भागीदारी आहे असे म्हणत या कंपनीने केलेल्या नियोजनावर संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतले आहेत. मात्र ठाण्यातील जाणकारांच्या मते ही कंपनी फार जुनी असून, या कंपनीला दोषी ठरविण्यात काही अर्थ नाही.
लाईट ॲण्ड शेड्स ही संदीप वेंगुर्लेकर यांची कंपनी आहे. वेंगुर्लेकर ठाण्यातच वास्तव्यास आहेत. या कंपनीचा नरेश म्हस्के यांच्याशी कागदोपत्री काहीही संबंध नाही. पण ही कंपनी जुनी असून, ठाण्यातील जवळजवळ सर्वच मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन हीच कंपनी करते. किंबहुना सर्व पक्षांच्या नेत्यांच्या कार्यक्रमाचे कंत्राट याच कंपनीकडे असते. राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक असे सर्वपक्षीय नेते त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन याच कंपनीकडे सोपवतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचे कंत्राटही या कंपनीकडे होते. त्यामुळे या कंपनीवर उगाच खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ठाणेकरांचे मत आहे.
ठाण्यातील कंपनीला दोष कशासाठी देता?
