मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मातब्बर नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना चौकशीला बोलावून जेलची हवा दाखवल्यानंतर आज तिसरे नेते जयंत पाटील यांची ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. दरम्यान ईडी कार्यालयातून बाहेर आल्यावर आपण ईडीच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. तर ईडीवर दबाव आणण्यासाठी ईडी कार्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. हे कार्यकर्ते सकाळपासूनच ईडी कार्यालयासमोर निर्दशने करत होते.
आयएल ॲण्ड एफएस भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने नोटीस पाठवून जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलावले. मात्र या भ्रष्टाचारात जयंत पाटील यांचा संबंध कसा आहे याचा नोटिशीत कोणताही उल्लेख केलेला नाही. परंतु ईडीने नोटीस पाठवल्याने जयंत पाटील आज सकाळी चौकशीसाठी हजर झाले. त्यानंतर तब्बल साडेनऊ तास त्यांची चौकशी झाली. रात्री साडेनऊ वाजता ही चौकशी संपली. त्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपण ईडीच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली असून, आता त्यांच्याकडे आणखी काही प्रश्न असतील असे वाटत नाही, असे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येथे येऊन या चौकशीविरोधात जो आवाज उठविला त्याबद्दल मी आभारी आहे. भविष्यातही असेच सहकार्य करा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांचेही
आभार मानले.
जयंत पाटील आज ईडी कार्यालयात हजर राहणार म्हटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच हातात काळे झेंडे, फलक, बॅनर आणि माझा स्वाभिमान असे लिहिलेल्या टोप्या घालून मुंबईत ईडी कार्यालयाजवळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. अशाच प्रकारचे आंदोलन नागपूर, नंदूरबार, पुणे, कोल्हापूर आणि सांगलीतही झाले. ‘डोळे उघड ईडी, डोळे उघड’ अशी भजनेही म्हटली गेली. ‘वातावरण फिरलंय, भाजपा घाबरलंय, ईडी म्हणजे भाजपाचा घरगडी,’ असे फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते. जयंत पाटील यांच्या सांगली परिसरात सांगली-मिरज रस्त्यावर
कार्यकर्त्यांनी काही काळ रास्ता रोकोही केला. पुण्यात काही काळ झाशीची राणी चौकात आंदोलन झाले. जयंत पाटील घरून निघाल्यानंतर आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले की, कोणताही आक्रस्ताळेपणा करू नका. मी चौकशीला जात आहे. मी कोणतीही गोष्ट चुकीची केली नसल्याने मला कशाचीही भीती नाही. जयंत पाटील ईडी कार्यालयाकडे गेले तेव्हा जितेंद्र आव्हाड त्यांच्या समवेत होते.
जयंत पाटील यांना पाठिंबा देत छगन भुजबळ म्हणाले की, जयंत पाटील यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे त्यांची कितीही वेळा चौकशी केली तरी काहीही होणार नाही. मात्र सुप्रिया सुळे म्हणाले की, ‘शरद पवारांनादेखील अशी नोटीस पाठवली होती. त्यानंतर महाराष्ट्रात काय झाले आपल्याला माहिती आहे. हे दडपशाहीच्या सरकार विरोधी पक्षातील लोकांना नोटीस पाठवतात. आधीची सरकारे होती त्यावेळी त्या स्वायत्त संस्था होत्या. आता अदृश्य हात या संस्था चालवतो. जो विरोधात बोलतो त्याला ईडीची नोटीस पाठवली जाते. जयंत पाटील यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हे गिफ्ट आले आहे. अनिल देशमुख यांच्या घरी 109 वेळा धाड पडली, नवाब मलिक जे काही बोलत होते ते आज खरे होत आहे.
जयंत पाटील यांच्या चौकशीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘या देशात सध्या जे कुणी सत्यासोबत उभे आहे किंवा केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतात, त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. ही देशात हुकूमशाही सुरू आहे.
जयंत पाटलांची साडेनऊ तास चौकशी! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे ‘दबाव’ प्रदर्शन
