जंजिरा किल्ला सप्टेंबर पर्यंत कुलूप बंद पर्यटकांना केवळ बाह्यदर्शन घेता येणार

मुरूड जंजिरा –
पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील हवामान आणि पाण्याच्या हालचाली अकस्मात पणे बदलत आहेत. त्यामुळे सुरक्षितता म्हणून पर्यटकांना प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग आतून पाहण्यासाठी कुलूपबंद करण्यात आल्याची माहिती पुरातत्व खात्याचे मुरूड अलिबागचे आधिकारी बजरंग येलीकर, यांनी मंगळवारी बोलताना दिली. सप्टेंबरपर्यत पावसाळी परिस्थिती पाहून जंजिरा पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश शासनाच्या पुरातत्व विभागा कडून येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

उन्हाळी सुट्टी शेवटच्या टप्प्यात असल्याने राहिलेले पर्यटक जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी येत आहेत.मात्र हवामानाचा विचार करता पर्यटकांना जंजिऱ्याकडे नेणाऱ्या मोटार लॉन्च आणि बोटीची वाहतूक बंद करण्यात आल्याचे श्री येलीकर यांनी सांगितले. त्यामुळे राजपुरी जेट्टी, खोरा बंदर जेट्टी,डोंगरी सनसेट पॉईंट वरून जंजिऱ्याचे बाह्यदर्शन पर्यटकांना घेता येईल. मांडवा ते गेटवे प्रवाशी जलवाहतूक बंद करण्यात आली असली तरी आगामी 10 ते 15 दिवस वाहने आणि एस टी बसेस मधून पर्यटक येतील अशा अंदाज पर्यटन क्षेत्रातील जेष्ठ मंडळींनी व्यक्त केला आहे. आजही मोठया संख्येने पर्यटक मुरूड तालुक्यात पर्यटनाला येत आहेत.

मुरूडचा 3 किमीचा सरळ समुद्रकिनारा देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. मुरूड, नांदगाव, काशीद येथील बीचवर आनंद घेण्यासाठी देखील पर्यटकांची वर्दळ सुट्टीच्या शेवटच्या टप्प्यात असेल असे काही हॉटेल्स आणि लॉजिंग मालकांनी सांगितले. साळाव ते रेवदंडा पूल दुरुस्तीचे कामासाठी अवजड वाहनांना अजूनही बंद आहे. तो केव्हा पूर्ववत सुरू होईल या बाबत मंगळवारपर्यंत अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. जंजिरा बंद असल्याने इतिहास प्रेमी पर्यटकांची मात्र घोर निराशा होणार आहे. जंजिऱ्याचे प्रवेश शुल्क 25 रु इतके आहे.15 वर्षा खालील मुलांचे प्रवेश शुल्क आकारण्यात येत नाही, अशी माहिती येलीकर यांनी दिली. 22 बुरुज असणारा पश्चिम किनारपट्टीवरील बलदंड जलदुर्ग म्हणून याचा इतिहासात उल्लेख होतो. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे या जलदुर्गाचे आधिकार आहेत. दरवर्षी पावसाळ्यात जंजिरा किल्ला आतून पाहण्यासाठी बंद ठेवण्यात येतो. सप्टेंबरपर्यंत समुद्राच्या पाण्याला उसळत्या पाण्याचा करंट असतो. त्यामुळे त्यावेळच्या परिस्थितीनुसार जंजिरा सुरू करण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top