पुणे – खडकवासला येथे डेंग्यूची साथ सुरू आहे. दाट लोकवस्तीच्या किरकटवाडी, कोल्हेवाडी, धायरी, नन्हे परिसरात गॅस्ट्रो तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. येथील जिल्हा परिषदेची अपुरी सेवा आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे साथ वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय.
खडकवासला कोल्हेवाडी येथील रस्त्याचे कामे अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साठून डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र खडकवासला, किरकटवाडीत आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अंतर्गत रस्त्यावर, तसेच नागरी वस्त्यांत साठते. त्यात मैलापाणी, सांडपाण्याची भर पडत आहे. या परिसरात गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आशा साथीच्या आजारांचे रूग्ण वाढले आहेत. या परिसरातील नागरिकांची संख्या दोन लाख असून त्याप्रमाणात आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही अशी तक्रार नागरिकांनी केलीय.
बहुतेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याने साथीच्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांची पूर्ण माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील दहा रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील पाच रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले