कोलकाता – संपूर्ण देशभरात मेट्रोचे जाळे पसरत आहे असताना सर्वात जुन्या कोलकाता मेट्रोने इतिहास रचला आहे. देशभरातील शहरांमध्ये वाहतुकीसाठी प्रभावी माध्यम ठरत असलेली मेट्रो देशात पहिल्यांदाच पाण्याखालून धावली. काही दिवसांपूर्वी कोलकातामधील ही अंडरवॉटर मेट्रोची चाचणी केली जाणार होती. परंतु ही चाचणी अचानक रद्द करण्यात आली होती. अखेर बुधवारी ही चाचणी यशस्वीपणे पार पडली.
कोलकाता मेट्रोने देशात प्रथमच नदीखाली बांधलेल्या बोगद्यातून मेट्रोची चाचणी पूर्ण केली. कोलकाता ते हावडा यादरम्यान करण्यात आलेल्या मेट्रोच्या ट्रायल रनमध्ये फक्त अधिकारी आणि अभियंतेच होते. यासंदर्भात माहिती देताना मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोलकाता आणि उपनगरातील लोकांना आधुनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. उदय कुमार रेड्डी यांनी कोलकात्याच्या महाकरण स्थानकापासून पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉरवरील हावडा मैदान स्थानकापर्यंत रेकमध्ये प्रवास केला.
कोलकाता मेट्रोने घेतलेली ट्रायल रन एक ‘ऐतिहासिक घटना’ असल्याचे सांगताना रेड्डी म्हणाले की, हावडा मैदान आणि एस्प्लनेड स्टेशन दरम्यान पुढील सात महिन्यांपर्यंत ट्रायल रन घेतली जाईल. त्यानंतर या विभागात नियमित सेवा सुरू होईल. तसेच, अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितले की, भूगर्भ विभागाच्या ४.८ किमी लांबीची ट्रायल रन लवकरच सुरू होईल. कोलकाता मेट्रोचे हे सेक्शन सुरू झाल्यानंतर हावडा मैदान देशातील सर्वात खोल असलेले मेट्रो स्टेशन म्हणून ओळखले जाईल. हे मेट्रो स्टेशन पृष्ठभागापासून ३३ मीटर खाली आहे. कोलकाता मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोने हुगळी नदीखालील ५२० मीटरचा भाग ४५ सेकंदात पार करणे अपेक्षित आहे.
कोलकाताचा अंडरवॉटर बोगदा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला आहे. पुढील तब्बल १२० वर्ष हा बोगदा जसाच्या तसा राहू शकतो, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे. नदीच्या बोगद्यात पाण्याचा थेंबही जाऊ शकत नाही. बोगद्यांच्या काँक्रिटमध्ये ‘हायड्रोफिलिक गॅस्केट’ आहे. बोगद्यांमध्ये पाणी आल्यास गॅस्केट उघडतील. बोगद्यात पाणी गेलेच तर त्यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी ‘टीबीएम’ पाणबुडीप्रमाणे काम करतील. पारंपरिक बोगद्याप्रमाणे नदीचा बोगदा एकदा सुरू झाल्यावर बंद करता येत नाही.