तिरुअनंतपुरम – काही दिवसांपूर्वी केरळमध्ये उपचार करणाऱ्या एका महिला डॉक्टरवर रुग्णानेच हल्ला केल्याने त्यात या डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांनतर डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. या घटनेनंतर राज्यातील डॉक्टरांनी आंदोलनेही केली होती. याची गंभीर दखल घेत आता केरळ सरकारने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार डॉक्टरवर हल्ला करणाऱ्यास ७ वर्षे तुरुंगवास आणि मोठ्या आर्थिक दंडाची शिक्षा होणार आहे.
केरळ सरकारने बुधवारी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित अध्यादेश मंजूर केला. सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, “केरळ मंत्रिमंडळाने आज मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केरळ हेल्थ केअर सर्व्हिस वर्कर्स आणि हेल्थ केअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऍमेंडमेंट अध्यादेश -२०१२ ला मंजुरी दिली आहे. सध्याच्या सुधारित कायद्यात नोंदणीकृत आणि तात्पुरते नोंदणीकृत डॉक्टर, नोंदणीकृत परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी, नर्सिंग विद्यार्थी आणि आरोग्य संस्थांमध्ये काम करणारे पॅरामेडिकल कर्मचारी यांचा समावेश आहे. या अध्यादेशानुसार आता पॅरामेडिकल विद्यार्थ्यांनाही कायद्यानुसार संरक्षण दिले जाणार आहे.
या अध्यादेशानुसार, आरोग्यसेवा व्यावसायिकाला शारीरिक इजा पोहोचवल्याबद्दल दोषी आढळल्यास आरोपीला १ ते ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच संबंधित आरोपीला एक ते पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाणार आहे. तसेच जर एखाद्या व्यक्तीने आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य संस्थांमध्ये काम करणाऱ्यांविरुद्ध हिंसाचार केला किंवा तसा प्रयत्न केला, तर त्याला ६ महिने ते ७वर्षांपर्यंत कारावास आणि ५० हजार ते दोन लाख रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता हा अध्यादेश केरळच्या राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास ६० दिवसांत पूर्ण केला जाईल आणि निकालासाठी जिल्हा स्तरावर विशेष न्यायालये स्थापन केली जाणार आहेत.