पंढरपूर – कार्तिकी एकादशी निमित्त आज पंढरपूर विठ्ठल मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट केली. तर यंदा मानाचे वारकरी म्हणून सगर दाम्पत्याला मान मिळाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिक एकादशीनिमित्त आज शासकीय महापूजा पार पडली. यानिमित्त विठ्ठल – रुक्मिणीच्या गर्भगृहात झेंडू , शेवंती, कार्नेशियन, गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या पाना फुलांची आकर्षक सजावट केली होती. या सजावटीसाठी वेगवेगळ्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला होता.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व सायली पुलकुंडवर व उदगीर तालुक्यातील बाबुराव सगर व सागरबाई सगर या दाम्पत्याने मानाचे वारकरी म्हणून विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. सगर दाम्पत्य १४ वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहे. गवंडीकाम करून आपला उदरनिर्वाह करणारे सगर दाम्पत्याचा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास दिला. प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवर तसेच मानाचे वारकरी ठरलेल्या सगर दाम्पत्याचा सत्कार केला. विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे सगर दाम्पत्याला अश्रू अनावर झाले.
वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी केले.