बीड- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात गेला महिनाभर असलेली तणावाची परिस्थिती आज अधिकच चिघळली. सरपंच देशमुख यांच्या हत्याकटात सहभागी असल्याचा आरोप ठेवून वाल्मिक कराड याला मोक्का कायद्याअंतर्गत काल एसआयटीने ताब्यात घेतले होते. आज कराड आणि हत्येतील आरोपींची फोनवर संभाषण झाल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केला आणि त्यामुळे त्याला कोठडी सुनावण्यात आली. यावेळी न्यायालयाच्या आवारात कराड समर्थक व विरोधक यांनी जोरदार घोषणा दिल्या.’
कराडला कडेकोट पोलीस बंदोबस्तात केज न्यायालयाऐवजी आज बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. एस आर पाटील यांनी कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी दिली. कराडला एसआयटी कोठडी दिल्याचे समजताच न्यायालयाच्या बाहेर कराड आणि देशमुख यांच्या समर्थकांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले.काही ठिकाणी कराड समर्थकांनी आत्मदहन करण्याचा प्रय़त्न केला तर कराडचे मूळ गाव असलेल्या पांगरीमध्ये एका समर्थकाने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. कराडच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने महिला आजही रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी परळी पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर लोळण घेत कराडच्या अटकेचा निषेध केला. त्यामुळे तणावात भर पडली.
कराडला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्या अधिक चौकशीसाठी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी करताना एसआयटीने काही महत्वाचे पुरावे सादर केले. संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाली त्या दिवशी हत्या खटल्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांचे 3.20 ते 3.40 या दरम्यान मोबाईल फोनवरून वाल्मिक कराड याचे दोन ते तीन वेळा संभाषण झाले. देशमुख यांचे अपहरण 3.30 वाजता झाले होते असा दावा एसआयटीने केला. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ एसआयटीने न्यायालयात घुले, चाटे आणि कराड यांच्यामध्ये 9 डिसेंबर रोजीच्या फोनचा सीडीआर सादर केला. कराड याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून त्याच्यावर याआधी चौदा फौजदारी गुन्हे दाखल असल्याने त्याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, असे एसआयटीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
एसआयटीच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. या खटल्यात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एकाही आरोपीने कराड यांचा हत्येच्या कटात सहभाग असल्याचे सांगितलेले नाही. केवळ सीडीआरच्या आधारावर आणि मीडियाच्या दबावापोटी पोलिसांनी कराडला खोट्या गुन्र्ह्यांत गुंतवले आहे,असा युक्तिवाद ॲड ठोंबरे यांनी केला. मात्र न्यायालयाने तो अमान्य केला. त्याचवेळी सरकार पक्षाच्या वकिलांनी केलेली दहा दिवस पोलीस कोठडीची मागणीही अमान्य करत त्याला सात दिवसांची म्हणजेच 22 जानेवारीपर्यंत एसआयटीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
न्यायालयात सुनावणी सुरू असताना बाहेर कराड यांचे समर्थक दुपारपासूनच मोठ्या संख्येने न्यायालयाच्या आवारात कराड यांच्या अटकेचा निषेध करत होते. कराडवर लावलेले सर्व आरोप मागे घ्या,अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली. जातीय राजकारणापोटी वाल्मिक कराड याचा बळी घेण्याचा प्रयत्न होत असून कराड यांच्यासाठी आम्ही प्रसंगी बलीदान करण्यास तयार आहोत,असे कराड यांचे समर्थक न्यायालयाच्या बाहेर सांगत होते. काही ठिकाणी कराड समर्थकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्नही केला.
पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती मुदत काल 14 जानेवारी रोजी संपल्यानंतर त्याला काल केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हापासूनच परळीमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले होते. कराडच्या समर्थनार्थ त्याची आई, पत्नीसह शेकडो महिलांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर संपूर्ण दिवसभर ठिय्या आंदोलन केले होते. तर सरपंच देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख समर्थकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. अशा तणावग्रस्त वातावरणात सायंकाळी केजच्या न्यायालयाने आपल्या निकालात कराडला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अचानक एसआयटी सक्रिय झाली आणि कराडला देशमुख यांच्या हत्याकटात सहभागी असल्याने खुनाच्या गुन्ह्यात मकोका कायद्यान्वये ताब्यात घेऊन आज थेट बीड जिल्हा न्यायालयात हजर केले.
जिल्हा न्यायालयात कराडवर मकोका लावण्यात येत असल्याची माहिती एसआयटीने दिली. ती मान्य करत न्यायालयाने एसआयटीला कराडचा ताबा दिला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्याला पुन्हा हजर करण्यास सांगितले होते.
न्यायलयाच्या आदेशानुसार मकोकाखाली अटक करण्यासाठीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर आज एसआयटी कराडला केज न्यायालयात हजर करणार होती. मात्र परळीसह संपूर्ण जिल्ह्यातील तणावग्रस्त परिस्थिती पाहता सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटीने ऐनवेळी केज न्यायालयात हजर करण्याचा निर्णय रद्द करून बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्याचा निर्णय घेतला. मात्र आज कराडला न्यायालयात हजर केले जाणार हे माहीत असल्याने परळी, शिरसा, धर्मापूर आणि पांगरी या गावांमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
वाल्मिकच्या पत्नीचा धनंजय मुंडेंवर राग
परळीत माध्यमांशी बोलताना आज वाल्मिक कराड याच्या पत्नीने अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की तुम्हाला निवडून येण्यासाठी , मोठे होण्यासाठी अण्णा (वाल्मिक कराड) पाहिजे. आता त्याच अण्णाला पायदळी तुडवून तुम्हाला वर चढायचे आहे का, तुम्ही आमच्या घरी नेहमी येत होतात. मग आज राजकारणासाठी त्याच अण्णाचा बळी द्यायला निघाला आहात का तुम्ही, असे रोखठोक प्रश्न वाल्मिक कराड यांच्या पत्नीने कोणाचेही नाव न घेता विचारले. तुम्हाला जे काही राजकारण करायचे असेल ते तुम्ही खुशाल मुंबईत बसून करा,अशा शब्दात वाल्मिकच्या पत्नीने आपला संताप व्यक्त केला.
धनंजय मुंडेंनी कराड
कुटुंबियांची भेट घेतली?
सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यापासून सातत्याने विरोधकांचे लक्ष्य ठरलेले आणि वाल्मिक कराडचा आका (बॉस) म्हटले जात असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी काल परळी गाठले होते . आज ते परळीतच होते . पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी आज पहाटेच्या वेळी कराड कुटुंबियांची गुपचूप भेट घेतली अशी चर्चा आज दिवसभर सुरू होती. ते आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडतील असे सांगितले गेले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली नाही आणि ते मीडियासमोरही आले नाहीत.
कराडला 7 दिवसांची कोठडी! तणाव वाढला! कोर्टाबाहेर समर्थक आणि विरोधकांचे आंदोलन
