Home / Top_News / उद्धव ठाकरेंकडून विचारपूसपण अजितदादांचा फोन नाही

उद्धव ठाकरेंकडून विचारपूसपण अजितदादांचा फोन नाही

जयंत पाटलांची प्रतिक्रिया मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची आयएल अँड एफएस कंपनीच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने नऊ...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जयंत पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई –

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची आयएल अँड एफएस कंपनीच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने नऊ तास चौकशी केली. या चौकशीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यभरातील प्रमुख नेत्यांनी आपल्याला फोन करून विचारपूस केल्याचे पाटील यांनी सांगितले. परंतु, अजित पवारांचा फोन आला होता का, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी नाही म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, नंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली.

अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना ईडीच्या चौकशीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, मी जयंत पाटील यांना फोन केला नाही. याआधी छगन भुजबळ, अनिल देशमुख यांचीही चौकशी झाली. पण मी कोणालाच फोन केला नव्हता. फोन करण्यापेक्षा भेटल्यावर बोलू. केंद्रीय व राज्याच्या यंत्रणा आहेत. त्यांना नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार असतो. त्यांनी बोलावल्यानंतर संपूर्ण सहकार्य करावे लागते. काल जयंत पाटील यांनी त्याबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे.

मुंबईत अधिवेशन सुरू असताना पुरवण्या मागण्यांवेळी अनेक सत्ताधारी आमदारांनी काय सांगितले हे रेकॉर्डवर आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे मंत्रिपदे उपभोगल्यानंतर भाजपमध्ये गेल्यावर पुण्यात एका माजी मंत्र्यांनी आम्हाला आता शांत झोप लागते सांगितले. तीच गोष्ट एका खासदाराने सांगलीत सांगितली, तर एका अकेंद्रीय राज्यमंत्र्यांनी आमच्याकडे निरमा वॉशिंग मशीन आहे असे वक्तव्य केले होते. वास्तविक एकीकडे सत्ताधारी पक्षाचे लोक कर नाही, तर डर कशाला अशी विधाने करत आहेत. मात्र द्वेषभावनेतून, राजकीय सूडबुध्दीने कुणाला बोलावण्यात येऊ नये, असेही पवार यांनी आपल्या लांबलचक खुलाशात सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. जयंत पाटील यांची ईडीची चौकशी सुरू होण्यापूर्वी ते प्रदेश कार्यालयात गेले, तेव्हा जितेंद्र आव्हाड वगळता राष्ट्रवादीचे इतर कुणी नेते त्यांना भेटायला तिथे उपस्थित नव्हते. यामुळेच ईडी चौकशीदरम्यान जयंत पाटील पक्षात एकाकी पडलेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या