मुंबई- आयआरसीटीसी अर्थात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळामध्ये आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने हे संकेतस्थळ बंद झाले. त्यामुळे लाखो प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढणे अशक्य झाले होते.अखेर दीड तासानंतर हे संकेतस्थळ पूरस्थितीत आले.याबाबत अनेक प्रवाशांनी आपला मनस्ताप समाज माध्यमांतून व्यक्त केला.
नववर्षानिमित्त बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची रेल्वे तिकीट काढण्यासाठी गडबड सुरू असताना आज सकाळपासून झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लाखो प्रवाशांना तिकीट काढण्यात अडचणी येऊ लागल्या.यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. ‘संकेतस्थळाच्या देखभाल-दुरूस्तीमुळे ई-तिकिटिंग सेवा उपलब्ध होणार नाही.कृपया नंतर प्रयत्न करा.’ असा संदेश प्रवाशांना संकेतस्थळावर दाखवण्यात येत होता. त्यामुळे प्रवाशांनी वारंवार आयआरसीटीसीचे संकेतस्थळ चालू-बंद करूनदेखील संकेतस्थळ सुरू होत नव्हते.अखेर सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास संकेतस्थळ पूर्वस्थितीत आले. परंतु, अनेक प्रवाशांची तिकिटाचे पैसे भरण्याची प्रक्रिया अर्धवट राहिली होती. तसेच तिकीट आरक्षणाचा तपशीलही दिसत नव्हता. अनेकांना नियमितसह विशेष रेल्वेगाडीचे आरक्षित तिकीट मिळाले नाही. या सर्व गडबडीमुळे अनेकांनी जवळचे रेल्वे स्थानक गाठून तिकीट काढले. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे सकाळी १०.०१ ते सकाळी १०.४० आणि सकाळी १०.५१ ते सकाळी ११.२३ वाजेपर्यंत संकेतस्थळ बंद होते. या कालावधीत प्रवासी आरक्षण प्रणाली सुविधा सुरू होती, अशी माहिती आयआरसीटीसीने दिली आहे.