मुंबई – स्वप्नांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईत अनेक सेलिब्रिटी आणि अब्जाधीशांची आलिशान घरे आहेत. आदित्य बिर्ला उद्योग समूहानेसुद्धा असाच एक वैभवी बंगला विकत घेतला आहे. मुंबईतील पॉश भागात असलेल्या या बंगल्याची किंमत २२० कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती झाप्केय डॉट कॉमने मिळवलेल्या कागदपत्रांवरून समोर उघडकीस आली आहे.
बिर्ला समुहाच्या ‘हॉस्पिटॅलिटी प्रॉपर्टीज’ने अधिग्रहित केलेली ही मालमत्ता तळमजला आणि वर दोन मजले अशी असून ती दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील कार्माइकल रोड, एमएल डहाणूकर मार्गाजवळ आहे. या आलिशान बंगल्याचे एकूण बांधकाम क्षेत्र १८,४९४.०५ चौरस फूट इतके आहे, तर त्याच्या आच्छादित गॅरेजचे क्षेत्रफळ प्रत्येकी १९० चौरस फूट आहे. या बंगल्याचा खरेदी व्यवहार १० एप्रिल २०२३ अशी असल्याची नोंद उपलब्ध दस्तऐवजामध्ये नमूद केली आहे. संबधित कागदपत्रानुसार खरेदीदाराने १३.२० कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. हा व्यवहार ‘डीड ऑफ ट्रान्सफर’द्वारे करण्यात आला आहे. हा बंगला अर्नी खरशेदजी दुबाश यांची मूळ मालमत्ता असून तिचे सध्याचे मालक म्हणून हयात असलेले आदि एन पालिया, डेरियस सोराब कंबट्टा, सायरस सोली नल्लासेठ, आदी हिरजी जहांगीर,बचेतन महेंद्र शाह यांच्यामार्फत ही मालमत्ता संपादित करण्यात आली आहे, असे कागदपत्रावरून दिसून येते.
२०१५ मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांनी लिटल गिब्स रोड, मलबार हिल येथे ४२५ कोटी रुपयांना प्रसिद्ध ‘जाटिया हाऊस’ विकत घेतले होते. हे घर म्हणजे एक दुमजली बंगला होता आणि अनेक मोकळ्या जागा आणि पार्किंगची मोठी जागा होती. २५००० स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर बांधलेले हे घर होमी भाभा यांच्या घरापासून काही अंतरावर आहे. २०१४ मध्ये ते ३७२ कोटी रुपयांना विकले गेले होते. याआधी २०२१ मध्ये, मुंबईतील सर्वात मोठ्या मालमत्तेच्या सौद्यांपैकी राधाकिशन दमाणी आणि त्यांचा भाऊ गोपीकिशन दमानी यांनी मुंबईच्या पॉश मलबार हिल भागात १००१ कोटींना स्वतंत्र बंगला विकत घेतला होता. ३१ मार्च २०२१ मध्ये या व्यवहाराची नोंदणी झाली होती. त्यावेळी ३ टक्के मुद्रांक शुल्क महाराष्ट्रात गृहनिर्माण युनिटच्या विक्रीवर लागू झाले होते.
आदित्य बिर्ला समूहाने मुंबईत २२० कोटींचा बंगला विकत घेतला
