वॉशिंग्टन – वॉशिंग्टन येथे प्रवासी विमान आणि लष्करी हेलिकॉप्टरची हवेत धडक झाली. ही घटना रोनाल्ड रीगन विमानतळाजवळ काल रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर दोन्ही विमान पोटोमॅक नदीत पडले. प्रवासी विमानात ४ क्रू मेंबर्ससह ६० लोक होते. तर लष्करी हेलिकॉप्टरमध्ये ३ जण होते. आतापर्यंत १८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर ४ जणांना पोटोमॅक नदीतून जिवंत बाहेर काढले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
पोटोमॅक नदीत शोध आणि बचाव कार्य सुरु आहे. यात यूएस पार्क पोलिस, डीसी मेट्रोपॉलिटन पोलिस विभाग आणि अमेरिकन सैन्यासह अनेक एजन्सींचा सहभाग आहे. या घटनेनंतर वॉशिंग्टन विमानतळावरील सर्व उड्डाणे रोखण्यात आली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन जारी केले. त्यात ते म्हणाले की, अपघाताची पूर्ण माहिती मिळाली आहे. मी अपघाताच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि अधिक तपशील देत राहीन. उपाध्यक्ष जेडी वन्स यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. दुर्घटनेत अडकलेल्या लोकांसाठी त्यांनी प्रार्थना करा असे आवाहन केले.
अमेरिकेत विमान व लष्करी हेलिकॉप्टरची धडक! अपघातात १८ प्रवासी ठार
