टोक्यो – वेटलिफ्टर मीराबाई चानूने सिल्व्हर मेडल जिंकून दिल्यानंतर भारतीय खेळाडू रविवारी नव्या जोमाने ऑलिम्पिक स्पर्धेत उतरले आहेत. रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती, भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दमदार सुरुवात केली आहे. आज सकाळी झालेल्या पहिल्या फेरीतील लढतीत सिंधूने इस्राइलच्या केसेनिया पोलिकारपोव्हाचा २१-७, २१-१० असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत पुढच्या फेरीत आगेकूच केली. सिंधूच्या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा मोठा वर्षाव होत आहे.
सुमारे २८ मिनिटे चाललेल्या या लढतीचे दोन्ही गेम्स अगदी आरामात जिंकून सिंधूने आपले वर्चस्व सिद्ध केले. सुरुवातीला धीम्या गतीने खेळणाऱ्या सिंधूने नंतर मात्र वेग पकडला. तिने पहिल्या गेममध्ये सलग १२ पॉइंट्स मिळवत १७-५ अशी आघाडी घेतली होती. पहिला गेम २१-७ ने जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने वर्चस्व कायम ठेवत २१-१० ने विजयाची नोंद केली आणि २८ मिनिटांत सामना पूर्ण केला. आता बुधवारी पी. व्ही. सिंधू हाँगकाँगच्या खेळाडूचा सामना करणार आहे.
दरम्यान, ऑलिम्पिकमधील अन्य लढतींमध्ये भारताच्या रोईंग टीमने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अर्जुन लाल आणि अरविंद सिंह यांच्या टीमने रेपचेज रेसमधून उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र भारताला सर्वाधिक अपेक्षा अलेल्या मनू भाकर हिला महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल गटात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पात्रता फेरीत मनू भाकर नवव्या, तर यशस्विनी डेसवाल ११ व्या स्थानावर राहिली.