या महामारीच्या काळात साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. लस हे व्हायरसविरूद्ध लढण्याचे शस्त्र आहे असे म्हणायला हरकत नाही. तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. कोविड १९ चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. शासनाच्या वतीने विविध टप्प्यांवर लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. दुस-या टप्प्यात ६० वर्षावरील नागरिक तसेच कोमॉर्बिड व्यक्तींचे लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.
वाचा – कर्करुग्णांनी लसीकरणासाठी घाबरु नका, तज्ज्ञांचे आवाहन
हृदयरोगी तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींनी लसीकरण करावे की नाही याबाबत अजूनही शंका दिसून येतात. अनेकांना याबाबत अनेक शंका असून केवळ अफवांवर विश्वास ठेवणे टाळावे. कोविड लस ही हृदयविकाराच्या रूग्णांसाठी सुरक्षित आहे. हृदयविकार व स्ट्रोक असलेल्या लोकांनी ही लस घ्यावी व कोविड १९ ला प्रतिबंध करावे असे आवाहन केले जात आहे. कोविड १९ मुळे –हदयविकाराच्या रुग्णांना गुंतागुंत होण्याचा धोका अधिक जास्त असतो. म्हणून वेळीच लसीकरण केल्यास तीव्र गुंतागुत टाळणे शक्य होते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीमचे घटक, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आदी समस्या असलेल्या व्यक्तींनी देखील लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणाचे सामान्य दुष्परिणाम म्हणजे वेदना, ताप येणे किंवा मळमळ होणे असे आहेत. हृदयरोग्यांनादेखील हेच दुष्परिणाम जाणवतील. ही लक्षणे २ दिवसांपर्यंत टिकू शकतात. तर त्यामुळे घाबरून जाऊ नका. ज्या रुग्णांची नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी मात्र कमीतकमी महिनाभर थांबणे आवश्यक आहे, असं सर एच एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे कार्डिओ-थोरॅसिक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले.
वाचा – कोरोना संक्रमण आटोक्यात येईपर्यंत उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे
लसीकरणानंतर आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात रहा. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आणि हातांची स्वच्छता कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. शिवाय खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल धरावा. आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे. कोविड १९ ला दूर ठेवण्यासाठी हृदयरोग्यांनी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. घरच्या घरी व्यायाम करणे, ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे, सर्व प्रकारची धान्य आणि डाळी यांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ, मसालेदार, तेलकट आणि जंक फूड यांचे सेवन टाळा. योग आणि ध्यान करून तणावमुक्त रहा.