हेमंत सोरेन पाठोपाठ कल्पना सोरेन यांचेही हेलिकॉप्टर रोखून धरले

रांची – झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांना प्रचार करण्यापासून रोखण्याची रणनिती भाजपाने आखल्याचा आरोप होत आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रोखल्यानंतर काल त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्याही हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना जवळपास एक तास हेलीपॅडवरच खोळंबून राहावे लागले.झारखंडमध्ये गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे हेलिकॉप्टर दोन वेळा रोखण्यात आले होते. काल त्यांच्या पत्नी व झामुमोच्या नेत्या कल्पना सोरेन यांचेही हेलिकॉप्टर रोखण्यात आले. कल्पना सोरेन यांनी काल दुपारी मुसाबनी विभागातील कुईलीसुता इथे प्रचारसभा घेतली. त्यानंतर त्या दुपारी अडीच वाजता पुढील सभांना जाण्यासाठी हेलिपॅडवर आल्या. या ठिकाणी त्यांना नो फ्लाईंग झोन असल्याचे सांगून त्यांचे हेलिकॉप्टर तिथेच थांबवण्यात आले. हेलिपॅडवर त्या तब्बल तासभर अडकून पडल्या होत्या. कल्पना सोरेन यांनी म्हटले आहे की त्यांच्या जगन्नाथपूर, लातेहार व तोरपा या गावातील सभा होऊ नयेत यासाठी हा प्रकार करण्यात आला. भाजपा निराश झाली असून आता ते आम्हाला प्रचार करण्यापासूनच रोखत आहेत. या प्रकारावर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात मला अडीच तास रोखून धरण्यात आले तर आता कल्पना यांना रोखले . गेल्या पाच वर्षांपासून भाजपा माझ्या कामांमध्ये अडचणी निर्माण करत असून आता ते प्रचारातही खोडा घालत आहेत. हे लोक एका पाठोपाठ एक कटकारस्थाने करत असून मला जेलमध्ये टाकूनही यांचे मन भरलेले नाही. याचेही कारणही लक्षात येत नाही. कल्पना सोरेन या येथील काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार होत्या.दरम्यान झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संपला असून या टप्प्यात ४३ मतदारसंघात मतदान होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top