मुंबई- रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे ते कर्करोगाशी झुंजत होते. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिने-नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विजय कदम यांच्यावर चार केमिओथेरपी व दोन सर्जरी झाल्या होत्या. मात्र, त्यांची कर्करोगाशी झुंज अयशस्वी ठरली. एक हरहुन्नरी कलाकार म्हणून विजय कदम यांची ओळख होती. स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणजे शारीर विनोदात हातखंडा असलेल्या मोजक्या मराठी कलाकारांपैकी एक होते.
मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर विजय कदम रंगभूमीचा मार्ग निवडला. ८०-९० च्या दशकांत विजय कदम यांनी रंगभूमीवर केलेल्या कामाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. ‘विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य’ आणि ‘खुमखुमी’ हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. १९८६ पासून आतापर्यंत विजय कदम यांनी ७५० हून जास्त प्रयोग केले.टूरटूर, गंमत जंमत, सही रे सही, पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांतून त्यांनी काम केले होते. दूरचित्रवाणीवर ती परत आलीये या मालिकेत त्यांनी केलेली भूमिका अखेरची ठरली. तेरे मेरे सपने, इरसाल कार्टी, दे दणादण, दे धडक बेधडक, हळद रुसली कुंकू हसलं अशा अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या असल्या तरी विनोदी अभिनेता म्हणून ते अधिक लोकप्रिय ठरले.
कदम यांच्या निधनानंतर ’मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून ते अगदी मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. अशा लोकप्रिय कलावंतास भावपूर्ण श्रद्धांजली.’ अशा शब्दांत शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.